Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi) घरात कलाकारांसोबत रील स्टार्सचाही समावेश करण्यात आला आहे.  रील स्टार सूरज चव्हाणने  बिग बॉसच्या घरात प्रवेश करून सगळ्यांनाच धक्का दिला.  बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi New Season) पहिल्याच एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपला डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी रील स्टार सूरज चव्हाण हा एकटा  पडला असल्याचे दिसून आले. 


बिग बॉसच्या घरातील सुरुवातच आव्हानांपासून झाली. घरात पाणी नसण्यापासून नाश्तादेखील देण्यात आला नव्हता. या दरम्यानच्या मोकळ्या वेळेत स्पर्धक एकमेकांशी संवाद साधताना दिसले. एकमेकांशी आणखी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर, दुसरीकडे भूकेमुळे कासावीस झालेल्या स्पर्धकांसाठी बिग बॉसने नाश्ता हवा असल्यास एक टास्क दिला. यामध्ये सर्वांनी निर्णय घेण्याची क्षमता नसणाऱ्या तीन सदस्यांची नावे सांगण्यास सांगितले. या टास्कमध्ये अनेकांनी सूरज चव्हाणचे नाव घेतले. 


सूरजचे नाव का?


घरातील सदस्यांनी सूरजचे नाव घेताना तो फारसा मिसळला नसून तो कोणाशी बोलत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. योगिता चव्हाणनेदेखील कोणत्याही बाबतीत फार काही मिसळला नाही.  त्यामुळे तो निर्णय घ्यायला मला कमी पडू शकतो असे वाटत असल्याचे म्हटले. त्यानंतर निक्की तांबोळी, घनश्याम दराडे, निखिल दामले, पुरुषोत्तम पाटील अशा काही सदस्यांनी सूरजला नॉमिनेट केले. 


आणखी कोणते सदस्य झाले नॉमिनेट?


सूरज चव्हाण शिवाय इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या दोघांची नावे कोणतेही निर्णय घेण्यास सक्षम नसलेले स्पर्धक म्हणून घरातील सदस्यांनी ठरवली. आता बिग बॉस या स्पर्धकांना आपण निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे दाखवण्यासाठी काही टास्क देणार आहे. या टास्कमध्ये तिघांनाही स्वत: ला सिद्ध करावे लागणार आहे. 


'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलिगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला.  पण असे असले तरी सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  बारामतीमधील या रील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. 


इतर संबंधित बातमी: