Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये राडा करणारी रॅपर आर्या जाधवला बिग बॉसने घरातून बाहेर काढले असले तरी तिचे अमरावतीमध्ये दणक्यात स्वागत झाले. आर्या जाधव ही मूळची अमरावतीमधील आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पण, तिने एका टास्कच्या दरम्यान घरातील सदस्य निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे बिग बॉसने तिची हकालपट्टी केली.


'हसल-२' या कार्यक्रमात रॅप सॉंगने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधवने बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये आपली छाप सोडली होती. आर्या ही अंतिम पाच स्पर्धकांमध्ये असू शकते असा अंदाज बांधला जात होता.  बिग बॉसच्या घरात तिने सात आठवडे मुक्काम केला. या दरम्यान झालेल्या नॉमिनेशनमध्ये प्रेक्षकांनी तिच्या पारड्यात भरभरून मते टाकली. एका टास्क दरम्यान निक्कीने ओरबडल्यानंतर तिच्यावर हात उगारल्याने आर्यावर कठोर कारवाई करत बिग बॉसने तिची शोमधून गच्छंती केली. बिग बॉसच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात निक्की आणि अरबाजवर कारवाई करण्याची मागणी  नेटकऱ्यांनी केली होती.


बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर आर्याने आपली भूमिका चाहत्यांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली. त्यानंतर आर्या तिच्या मूळगावी अमरावतीला परतली. त्यावेळी तिचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


ढोल, ताशे अन् रॅली... 


अमरावतीला आल्यानंतर आर्याच्या चाहत्यांनी तिच्या स्वागत करताना खास रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. यावेळी जल्लोषात आर्याचे स्वागत करण्यात आले.






जवळपास दीड महिने बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर घरी  परतलेल्या लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर झाले.  आर्याला भेटल्यानंतर काही चाहत्यांना आपल्या भावनांना अश्रूद्वारे वाट मोकळी करून दिली. 










आर्याच्या आणि इतर काही इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आले. नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आर्याचे कौतुक केले आहे. काही नेटकऱ्यांनी बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. तर, काहींनी एवढं जल्लोषात स्वागत करण्याइतपत तिने काय केलंय असा सवाल केला आहे.