Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh Mahesh Manjrekar : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असून या सीझनच्या होस्टची धुरा अभिनेता आणि महाराष्ट्राचा लाडका दादा रितेश देशमुखकडे (Riteish Deshmukh) आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या चार सीझनचे होस्ट म्हणून अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी जबाबदारी सांभाळली होती. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेशची निवड का केली, असा  अनेकांना प्रश्न पडला होता. यावर अनेक चर्चांना उधाण आले होते. आता, 'बिग बॉस मराठी'च्या मास्टरमाईंडने पहिल्यांदाच यावर भाष्य केले.


यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन सुरू झाल्यानंतर घरातील सदस्यांच्या आठवडाभराचा आढावा घेण्यासाठी वीकेंडला 'भाऊचा धक्का' असतो. यामध्ये होस्ट रितेश देशमुख घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतात. याआधीच्या सीझनमध्ये 'चावडी' असायची.  एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटीव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड  केतन माणगावंकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर ऐवजी रितेश देशमुखची निवड का करण्यात आली, यावर भाष्य केले.  


रितेशची निवड का?


एका प्रश्नाला उत्तर देताना केतन माणगावंकर यांनी सांगितले की, बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन वेगळा आहे. या सीझनमध्ये आम्ही दृष्टिकोन बदलला आहे. गेल्या चार हंगामात आम्ही एका विशिष्ट प्रकारचे क्लासिक फॉरमॅट फॉलो करत होतो. विशेषत: या हंगामात आम्हाला काही गोष्टी बदलायच्या होत्या. या सीझनमध्ये तीन गोष्टी बदलल्या आहेत. यामध्ये होस्टही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. महेश मांजरेकर हे अप्रतिम काम करत होते. एका ठाराविक काही वर्षात  प्रेक्षकांना कामात साचलेपण येत असल्याचे वाटू शकते. त्यामुळे होस्ट बदलण्याचा निर्णय घेतला. आम्ही रितेश देशमुख यांच्या नावाचा विचार केला. रितेश हे फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले अभिनेते आहेत. 


या सीझनमध्ये आणखी काय बदल केले?


या सीझनमध्ये आम्ही क्लासिक फॉरमॅटमधून वेगळ्या फॉरमॅटमध्ये गेलो आहोत. आम्ही ‘चक्रव्यूह’ नावाची थीम स्वीकारली आहे. ती म्हणजे ‘बिग बॉस’ नेहमी म्हणतात की ''जर तुम्हाला खेळ माहित आहे असे वाटत असेल पण तसं काही नाही'' आणि बिग बॉसच्या या बोलण्यातला अर्थ काय, हे या सीझनमध्ये दिसत आहे. 


केतन यांनी पुढे सांगितले की, या सीझनमधील तिसरा घटक म्हणजे वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी यांसारखी मोठी नावे असलेल्या स्पर्धकांसोबत धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर यांसारख्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर यांचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे या शोसोबत नवीन प्रेक्षक जोडले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


रितेश देशमुख की महेश मांजरेकर? नेटकऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे


मागील काही आठवड्यांपासून बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. एका टास्कच्या दरम्यान, आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशि‍लात लगावली. त्यानंतर आर्याची घरातून गच्छंती करण्यात आली. त्याशिवाय घरात अरबाज पटेल, निक्की आक्रमक खेळताना इतर सदस्यांना धक्काबुक्की करतात. त्यांच्याबाबत रितेश देशमुख मवाळ भूमिका घेत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून करण्यात आला. तर, रितेश देशमुख यांचे होस्टिंग अतिशय चांगले असून त्यांची वेगळी शैली असल्याचा मुद्दाही नेटकऱ्यांनी मांडला.