Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) आजपासून (2 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवे धमाके पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा स्पर्धकांना 100 दिवस लॉक करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस मराठी 4’चं भव्य दिव्य घर सज्ज झालं आहे. नुकतीच या घराची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यंदा या घरात प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळणार आहेत.


नेहमीप्रमाणेच यावेळीही ‘बिग बॉस मराठी’चं घर भव्य दिव्य असणार आहे. या घरात जिम, स्विमिंग पूल, डायनिंग एरिया, गार्डन, स्वयंपाकघर आणि कॅप्टन रूमसह स्पर्धकांसाठी सुसज्ज बेड आहेत. परंतु, याहीपेक्षा वेगळ्या आणखी काही गोष्टी यंदा घरात दिसणार आहेत. यंदा हे घर गुलाबी रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे.


पाहा व्हिडीओ :



‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात प्रवेश करताच समोर पारंपारिक तुळशी वृंदावन दिसते. त्यापुढे स्विमिंगपूल आणि जिम एरिया आहे. बाहेरच्या आवारात मराठमोळ्या फेट्यांची आरास करण्यात आली आहे. त्यासोबतच सजावटीमध्ये कटिंग चहाच्या कपांची आरास करण्यात आली आहे. योगा एरियात कॅरम अन् इतर बैठ्या खेळांच्या साहित्याचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. तर लीव्हिंग एरियात गुलाबी रंगाची थीम करण्यात आली आहे. सोबतच फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. तर, मोराची नक्षी असलेल्या नथीची आरास देखील करण्यात आली आहे.


अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकघर


या घरातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. यावेळी स्वयंपाक घराला देखील नवा लूक देण्यात आला आहे. मातीची सुंदर भांडी या घरात ठेवण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर मातीच्या भांडी भिंतीवर सजवून त्याने स्वयंपाक घर सुशोभित करण्यात आले आहे. यात मराठमोळ्या पदार्थांचा देखावा करण्यात आला आहे. भिंतीवर मोठे मोदक, करंज्या असे पदार्थ दिसत आहेत. याने या घराला एक वेगळीच शोभा मिळवून दिली आहे.


यंदा स्पर्धक आणि प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राईज


थीम वगळता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सगळ्या गोष्टी तशाच आहेत. मात्र, सोबतच एक खास सरप्राईज देखील दिसणार आहे. गेल्या तीन सीझनमध्ये नसलेली एक गोष्ट या पर्वात दिसणार आहे ती म्हणजे या घराची बाल्कनी. यंदा घरात बाल्कनी देखील देण्यात आली आहे. या बाल्कनीत विशेष सजावट करण्यात आली आहे. 'चाळ संस्कृती' अशी या घराची थीम असणार आहे. आजपासून हे घर आणि स्पर्धक पुढचे 100 दिवस प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे.


संबंधित बातम्या


Siddharth Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी 'बिग बॉस'च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया


Mahesh Manjrekar : 'त्याला' बिग बॉसच्या घरात बंद केलं पाहिजे; महेश मांजरेकरांची एबीपी माझाला Exclusive माहिती