Mahesh Manjrekar On Bigg Boss : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून चाहते या पर्वाची आतुरतेने वाट बघत आहे. 'बिग बॉस' सुरू झाला की नेटकरी या कार्यक्रमाला, स्पर्धकांना चांगलच ट्रोल करत असतात. 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) एबीपी माझाला प्रतिक्रिया देत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
महेश मांजरेकर म्हणाले आहेत,"ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या मुलांनाही त्या कमेंट्स न वाचण्याचा सल्ला देतो. प्रत्येकाचे चाहते असतात. त्यामुळे मी जर एका स्पर्धकाला झापलं तर त्याच्या चाहत्यांना वाटणारच की मी भेदभाव करतो. पण या गोष्टीला पर्याय नाही. मी कधीच भेदभाव करत नाही. कारण माझा कोणीच आवडता स्पर्धक असा नसतो. कोण विजेता होणार हे प्रेक्षकच ठरवत असतो. त्यामुळे तो जसा चाहत्यांना आवडतो तसाच मला आवडतो".
'बिग बॉस मराठी'च्या घरात महेश मांजरेकरांना कोणते स्पर्धक हवेत?
'बिग बॉस मराठी'च्या घरात महेश मांजरेकरांना सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडेंना बघायला आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील आणि हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील.
महेश मांजरेकर 'बिग बॉस'चा एपिसोड किती वेळा पाहतात?
महेश मांजरेकर म्हणाले,"बिग बॉस'चा जो एपिसोड प्रेक्षक पाहतात तोच मी पाहतो. कारण वेगळं काय पाहून ते बोललो तर प्रेक्षक म्हणील हा वेगळा काय बोलतोय. प्रेक्षक फक्त एक एपिसोड एकदाच पाहतात. मी दोनवेळा पाहतो. दुसऱ्यांदा पाहताना मला कुठे रिअॅक्ट करायचं आहे याची नोंद ठेवतो".
'बिग बॉस'बद्दल महेश मांजरेकर पुढे म्हणाले,"घरातदेखील भांड्याला भांड लागतं. प्रेमविवाह झालेली जोडपी महिन्यातून दोनवेळा तरी भांडतात. तसचं स्पर्धकांना खेळ कसा खेळायचा हे कळलं की ते रिअॅक्ट होतात. मग भांडणं होतात. त्यांच्यात होणारी भांडणं ही कधी कॅप्टन होण्यासाठी असतात तर कधी जिंकण्यासाठी. भांडणाला पर्याय नाही. ती चालत राहणार. या खेळात प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या पद्धतीने खेळत असतो". स्पर्धकांना टास्क द्यायला मांजरेकरांना आवडतं, त्यामुळे ते या कार्यक्रमाची प्रतीक्षा करतात.
संबंधित बातम्या