मुंबई : 'भाभी जी घर पे है' मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शुभांगी अत्रेचं पतीसोबत पटत नसल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र पतीशी वितुष्ट आल्याच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शुभांगीने दिलं आहे.

'माझ्या आयुष्यात काहीतरी घडत आहे आणि मलाच ते माहित नाही, हे बघून मला आश्चर्याचा धक्का बसला.' असं शुभांगी उपरोधाने हसत म्हणते. 'हे सगळं तथ्यहीन आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदात आहे. आम्ही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हा आम्हीच आश्चर्यचकित झालो. या अफवा कुठून पिकल्या कोणास ठावूक' असं शुभांगीने एका वेबसाईटला सांगितलं.

शुभांगी आणि तिचा पती पियुष पोरे एकमेकांना दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून ओळखतात. दोघांच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. त्यांना बारा वर्षांची मुलगीही आहे.

'मी एक मुलगी आहे, एक पत्नी, एक आई, एक सून, एक जबाबदार अभिनेत्री आहे. लोक तुमच्याबद्दल बोलणारच. पण लोकांनी मला माझ्या कामाबद्दल ओळखावं. सुरुवातीला मी अशा बातम्या वाचून टेंशन घ्यायचे. मी सेलिब्रिटी असल्यामुळे लोकं माझ्याबद्दल काहीपण लिहिणार हे मी समजून घेतलं.' असं शुभांगी सांगते.

'मी आणि पियुष एकत्र लहानाचे मोठे झालो. आम्ही एकमेकांना दहावीत असल्यापासून ओळखतो. जूनमध्ये आमच्या लग्नाला 16 वर्ष होतील. आमचं नातं खूप खास आहे.' असंही शुभांगीने सांगितलं.