मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतच दोन चिमुकल्या मुलींवर पाशवी अत्याचाराच्या घटनेनं देशभरात खळबळ माजली आहे. शाळेतच मुलींसोबत गैरकृत्य घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध होत असून सेलिब्रिटींनीही यावर कडक शब्दात प्रतिक्रिया मांडली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही या घटनेचा निषेध करत या गैरकृत्यासाठी शिवरायांच्या काळातील शिक्षेची आठवण करुन दिली आहे.
बदलापूर प्रकरणात शिवरायांच्या काळातील शिक्षेचा दाखला
बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुखने तीव्र शब्दात प्रतिक्रिया मांडली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत छत्रपती शिवरायांच्या काळातील शिक्षेचा दाखला दिला आहे. रितेश देशमुखने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत कठोर शब्दात टीका केली आहे. अशा नराधमांसाठी शिवरायांच्या काळातील शिक्षेची तरतूद हवी असं त्याने म्हटलं आहे. शिवरायांच्या काळातच असे महिलांसोबत गैरकृत्य करणाऱ्यांना चौरंग शिक्षा दिली जायची.
नराधमांसाठी रितेश देशमुखनं मागितली चौरंग शिक्षा
अभिनेता रितेश देशमुखने एक्स मीडियावर पोस्ट करत लिहिलंय की, "एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलेला, दुखी आणि रागाने भरलो आहे. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना दिली ती - चौरंग शिक्षा - हा कायदे पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे."
चौंरग शिक्षा म्हणजे काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन केलं जायचं. रांझे गावच्या भिकाजी गुजर पाटलाने महिलेसोबत गैरकृत्य केल्यामुळे चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा म्हणजे आरोपीचे दोन्ही हात आणि पाय कलम करणे. रितेश देशमुखने बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीसाठी याच चौरंग शिक्षेची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :