Ankita Walawalkar  : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सुरुवातीला चाचपडून खेळणारी अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आता आपला खेळ दाखवू लागली आहे. अंकिता वालावलकरने एका व्हिडीओ मुलाखतीत आपल्या प्रेम प्रकरणाबाबत माहिती दिली होती. अंकिताने सांगितले की, 16 वं वरीस धोक्याचं आहे, असे म्हणतात. माझ्याबाबतही तसेच झाले असल्याचे तिने म्हटले. मी 16 व्या वर्षी प्रेमात पडले. मात्र, मी ज्या मुलाच्या प्रेमात पडले. तो मुलगा माझ्यापेक्षा वयाने 10 ते 12 वर्षांनी मोठा होता. आमच्यात एक जनरेशन गॅप होता. वयात अंतर असलेली अशी 90 टक्के प्रेम प्रकरणे यशस्वी ठरत नसल्याचे अंकिताने म्हटले. 


मी प्रेमात का पडले?


अंकिताने आपला अनुभव सांगताना म्हटले की, मी कठोर शिस्तीत वाढले. कठोर अत्याधिक शिस्तीमुळे माझी एक प्रकारे भावनिक-मानसिक कोंडी झाली. मला अभ्यासाची  फार आवड नव्हती. पण घरातील लोकांच्या धाकाने बळजबरी अभ्यासाला बसत होती. शाळेत पहिला नंबर यायचा. पण, त्यात मनापासून फार आनंद वाटावा असे काही नव्हते. 


आता, बाबांना चॉकलेट मागितलं तरी कशाला हवंय, का हवंय असे विचारायचे. पण अशा वेळी तुम्हाला एखादा मुलगा तुम्हाला चॉकलेट  आणू देतो असे म्हटले की तुम्हाला खूप बरं वाटतं. आई-बाबांकडे तुम्ही एखाद्या चित्रपटाला जाऊयात  असे म्हटले की नकार मिळतो पण तो मुलगा तुम्हाला चित्रपटाला नेतो. तुम्हाला फिरायला नेतो तेव्हा तुम्हाला भारी वाटते. तुम्हाला मुलगा चांगला वाटू लागतो. पण तुमचे कुटुंब आवडत नाही , आई-बाबा आवडत नाही. या सगळ्या त्रागातून एक वेळ आली की मी आई-बाबांना विचारलं की तुम्ही माझ्यासाठी काय केलं?  


मुलासोबत पळून गेले...


घरातील वादानंतर  मुलाला लग्न करूयात असे म्हटले. त्याच वेळी माझ्या प्रेम प्रकरणाबाबत आईला कळलं. आई मला शोधत शोधत आली. त्यावेळी मी त्या मुलासोबत त्याच्या घरी पळून आली. मी त्याच्या घरी आल्याने मी आता सुरक्षित आहे असे वाटू लागले. मी 18 व्या वर्षांची होती. आम्ही लग्न केले नाही, पण लग्न केले अशी चर्चा होती. मी देखील आम्ही लग्न केलं असंच सांगितले. पण, मला याचा काही फरक पडत नव्हता. मी प्रेमात आंधळी झाली होती. मी ज्याच्यासोबत पळून आले तो मुलगा मुंबईत जॉबला होता. त्यामुळे तो इथे येऊन-जाऊन होता. त्याच्या घरी माझं शिक्षण पूर्ण केले. त्या दरम्यानची सहा-सात महिने माझ्या आई-वडिलांची स्थिती काय झाली असेल याचा विचार मनात आल्यावर अजूनही वाईट वाटते.
मुलासोबत माझं फारसं जमल नाही पण त्याची आई खूपच चांगली होती. तिने मला कायमच शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.  


निर्णय चुकीचा असल्याची जाणिव झाली...


मुलासोबत पळून जाऊन त्याच्या घरी राहण्याचा माझा निर्णय किती चुकीचा होता, याची जाणीव काही महिन्यातच झाली. परतीच्या वाटा बंद झाल्याचे वाटत होते. आता, पुन्हा माघारी फिरल्यावर समाज काय म्हणेल,  चारचौघात काय म्हटले जाईल याची भिती होती. 


त्यावेळी मी माझ्या घरी जाऊन आई-बाबांना भेटली. माझी चूक सांगितली. हा मुलगा तु्म्हालाही सांभाळेल असे वाटत होते. पण, तसे झाले नाही हे आई-बाबांना सांगितले. त्यावेळी आई-बाबांनी सांगितले की, आता जो निर्णय घेशील तो अंतिम असेल. या निर्णयावर तू विचार कर असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. रिलेशनशीपमध्ये असताना आम्ही खूप भांडलो, एकमेकांच्या चुका दाखवल्या. पण, रिलेशनशीपमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांबद्दल कधीही  वाईट म्हटले नाही असेही अंकिताने म्हटले.


मुलींना सावरण्यास मदत करा...


मुली प्रेमात असतात तेव्हा त्या कोणालाही ऐकत नाही. पण, तिला उपरती झाल्यानंतर मात्र, तिला सावरण्यास पालकांनी मदत करावी. तिचा निर्णय कसा चुकला आहे, हे दाखवून देण्यापेक्षा तिला अनुभव आल्यानंतर ती पु्न्हा त्याचा पुनर्विचार करेल असेही अंकिताने म्हटले. आपल्या नात्यात त्रास होत असल्यास फक्त पैसै घेऊन नात चांगलं होणार नाही. याउलट त्यात आणखी वाईटपणा येईल. मुलींनी शिक्षण पूर्ण करण्यावर, आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही अंकिताने दिला.