Ritiesh Deshmukh :  'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) लयभारी खेळ काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख आहे. रितेश भाऊ आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवत आहे. 'भाऊच्या धक्क्या'वरील (Bhaucha Dhakka) त्याच्या सादरीकरणाचं जगभरात भरभरून कौतुक होत आहे. पण या वीकेंडला मात्र व्यस्त चित्रीकरणामुळे त्याला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. त्यामुळे रितेश भाऊची (Ritiesh Deshmukh) आठवण काढत हा भाऊचा धक्का पार पडला.


'शो मस्ट गो ऑन' म्हणत 'बिग बॉस मराठी'च्या घरातला कल्ला सुरू राहिला. शनिवारी पार पडलेल्या 'महाराष्ट्राचा धक्का'ला महाराष्ट्रातील पत्रकारांनी तर रविवारी 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटातील कलाकार म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी आणि अभिनयसम्राट अशोक सराफ यांनी हजेरी लावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेलेल्या या सर्वच कलाकारांना रितेशची खूप आठवण आली. 


प्रेक्षकांनी केलं भाऊला मिस


दरम्यान भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांनी भाऊला मिस केलं. त्यावर प्रतिक्रिया देत एका युजरने म्हटलं की, आम्ही रितेश भाऊची वाट पाहत आहोत. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आम्ही रितेश भाऊंना मिस करतोय. रितेशने 'भाऊचा धक्का' एका वेगळ्या उंचीवर नेला आहे. दिवसेंदिवस तो हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजवत आहे. रेकॉर्ड्स ब्रेक करण्यासह महाराष्ट्रातील घराघरांतील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात रितेश भाऊ यशस्वी झाला आहे. 'बिग बॉस मराठी'ला त्याने नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे.


प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय भाऊचा धक्का


रितेशमुळे यंदाचा सीझन खूप हटके ठरतोय. सीझनला अधिक टवटवीत आणि तरुण करण्यात त्याचा महत्त्वाचा हातभार लागत आहे. परिस्थितीनुसार रितेश भाऊ कधी कोणत्या सदस्याचा मित्र होतो तर कधी कोणाचा गुरू, कोणासोबत ग्रॅण्ड मस्ती करतो तर कोणासोबत लय भारी दोस्ती. कोणाचं काही चुकलं तर त्यांची शाळाही घेतो तर कोणाची पाठही थोपटतो, कधी शाबासकीही देतो. रितेश भाऊच्या या अनोख्या अंदाजाचं 'बिग बॉस' प्रेमी प्रशंसा करताना दिसून येत आहेत.                                      


ही बातमी वाचा : 


Kiran Rao : 'लापता लेडीज'ची ऑस्कर झेप, किरण रावची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली....