Kiran Rao : किरण राव (Kiran rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. किरण रावचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या पहिल्याच सिनेमाची दखल ऑस्करनेही घेतली आहे. दरम्यान या सिनेमाची कथा ही प्रत्येकालाच भावली. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या कथेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही चांगल यश या सिनेमाने मिळवलं.
दरम्यान यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण राव हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने ऑस्कर टीमचे, तिच्या सर्व टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील साध्या घरातील स्त्रियांची ही गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष सिनेमाच्या गोष्टीने वेधून घेतलं. किरण रावने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
किरण रावने काय म्हटलं?
किरण रावने तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या गोष्टीचा खूप आनंद झालाय. ही माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाची घेतलेली दखल आहे. सिनेमा हे मनं जोडण्यासाठी, सीमा ओलांडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणांसाठी कायमच एक प्रभावी माध्यम राहिलं आहे. मला आशा आहे की हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'
'मी निवड समितीचेही मनापासून आभार मानते ज्यांनी या सिनेमावर विश्वास ठेवला आहे. यंदाच्या वर्षात सगळ्या चांगल्या सिनेमांमधून आमच्या सिनेमाची निवड होते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण यासाठी आम्ही सगळे पात्र आहोत. मी आमिर खान प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज् यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास दाखवला.'
'प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. तुमचा हा विश्वासच आम्हाला नवनवीन गोष्टी करण्याचं बळ मिळतं. या अतुलनीय सन्मानासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही हे घेण्यास उत्सुक आहोत आणि मोठ्या उत्साहाने पुढचा प्रवास करणार आहोत...'