Tragic Accident on Anupamaa Set : टीआरपीच्या शर्यतीत असणारी अनुपमा मालिका कायम चर्चेत असते. आता पुन्हा हा मालिका चर्चेत आली आहे. पण, यामागचं कारण काही वेगळं आहे. रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' मालिकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघातात कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आहे.
रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा'च्या अडचणीत वाढ!
अनुपमाच्या मालिकेतील सेलिब्रेशन सीन शूट करताना कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला. गुरुवारी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अनुपमाचे निर्माते आणि वाहिनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. याप्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला जबाबदार धरले आहे.
कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूचं प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असोसिएशने पत्राद्वारे ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात असोसिएशनने अनुपमा मालिकेच्या निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध आयपीसी कलम 302 अन्वये एफआयआर दाखल करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
भारतीय चित्रपट उद्योगातील कलाकार आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या AICWA संघटनेने 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर 32 वर्षीय क्रू मेंबरच्या मृत्यूला हत्या म्हटलं आहे. निर्माते, प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनल यांच्या निष्काळजीपणामुळे क्रू मेंबरची संस्थात्मक हत्या झाल्याचा आरोप AICWA संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पत्राची प्रत AICWA च्या अधिकृत X हँडलने शेअर केली आहे.
सिने वर्कर्स संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑल इंडियन सिने वर्कर्स संघटनेने लिहिलेल्या पत्रानुसार, 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता कॅमेरा असिस्टंटचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूचं कारण सेटवरील उपकरणांचा निष्काळजी वापर असल्याचं असोसिएशनने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतरही प्रोडक्शनने रात्री उशिरापर्यंत मालिकेचं शुटींग सुरूच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशीही शूटिंग सुरूच होतं. प्रॉडक्शन हाऊसने मृत कामगाराच्या कुटुंबीयांना भेटण्याची तसदी घेतली नाही किंवा या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.
काय आहेत असोसिएशनच्या मागण्या?
ऑल इंडियन सिने असोसिएशनने म्हटलं आहे की, मालिकांच्या सेटवर अनेकदा जुन्या तारा प्लास्टिकच्या टेपने जोडल्या जातात. त्यामुळे सेटवर काम करणाऱ्या कामगारांसाठी ही जागा मृत्यूचा सापळा बनली आहे. मूलभूत सुरक्षा प्रोटोकॉलही येथे पाळले जात नाहीत आणि त्यामुळे कॅमेऱ्यांच्या मागे काम करणाऱ्या कामगारांच्या अडचणी वाढतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात असोसिएशनने पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
- अनुपमा मालिकेचे निर्माते, प्रोडक्शन हाऊस, चॅनल, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावा.
- दोन मृत कामगारांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी.
- जोपर्यंत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत अनुपमा आणि या प्रोडक्शन हाऊसच्या सर्व मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालावी.
- सर्व मालिकांच्या सेटवर सेफ्टी प्रोटोकॉल तपासले जावेत आणि जिथे ते पाळले जात नाहीत, तिथे कठोर कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारला जावा.
- एका व्यक्तीच्या मृत्यूला केवळ कचरा समजणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना होऊ नये.
महत्त्वाच्या इतर बातम्या :