स्वप्नील जोशी सात वर्षांनी, तर सिद्धार्थ चांदेकर तब्बल नऊ वर्षांनी टीव्हीवर दिसणार आहे. या तिघांसोबत मालिका विश्वातला ओळखीचा चेहरा मधुरा देशपांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'जिवलगा' मालिकेतून एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेची संकल्पना अभिनेते-दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे.
डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. 'स्टार प्रवाह'वर 8 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका पाहायला मिळेल.
स्वप्नील जोशी याआधी अधुरी एक कहाणी, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या झी मराठीवरील मालिकांमध्ये झळकला होता. तर सिद्धार्थने स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र मालिकेतूनच मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. अमृताने काही रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन आणि परीक्षण केलं आहे, मात्र सिरीअल करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.
'कोणतंही काम जेव्हा पहिल्यांदा करताना मी खूप उत्साही असते. याआधी मी कधीच टीव्ही मालिका केलेल्या नाहीत. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे भूमिका. मग वेब सिरीज असोत, मराठी-हिंदी चित्रपट असोत किंवा रिअॅलिटी शो. 'जिवलगा'मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जितकी मजा मला ही भूमिका साकारताना येतेय तितकीच ती तुम्हाला बघताना येईल' अशी प्रतिक्रिया अमृताने व्यक्त केली आहे.