Bigg Boss Marathi Season 2: बिग बॉसच्या घराची जागा बदलली!
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2019 12:11 PM (IST)
आता या शोमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, आता दुसऱ्या सिझनचं चित्रीकरण मुंबईत होणार अशी चर्चा आहे. स्पर्धकांएवढीच बिग बॉसच्या घराबाबतही प्रेक्षकांमध्ये आकर्षण होतं. स्विमिंग पूल, लॉन असलेल्या या भल्यामोठ्या घराची भुरळ अनेकांना पडली होती. लोणावळ्यात या घराचा सेट उभारण्यात आला होता. हिंदीतील 'बिग बॉस'प्रमाणे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनचं चित्रीकरण लोणावळ्यात झालं होतं. यंदा मात्र चित्रीकरणाची जागा बदलण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस मराठी'चा सेट उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मल्याळम 'बिग बॉस'चं चित्रीकरण फिल्म सिटीमध्ये झाले होते. मुंबईत चित्रीकरण करणे शोच्या दृष्टीने सोयीस्कर असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याविषयी वृत्त दिलं आहे. आता या शोमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच ऑफ एअर होणाऱ्या 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतील कलाकार बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरु आहे. या मालिकेतील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉस मसाठीच्या दुसऱ्या पर्वात दिसणार असल्याचे बोललं जात आहे. याशिवाय माझ्या नवऱ्याची बायकोमधील पहिली शनाया अर्थात रसिका सुनिललाही बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली होती. स्वत: रसिकाने याचा खुलासा केला होता. याशिवाय तांबडे बाबा उर्फ मिलिंद शिंदे यांनाही दुसऱ्या पर्वासाठी विचारणा झाली होती. बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का असं विचारलं असता हे हसले पण काहीही बोलण्यास नकार दिला. बिग बॉस मराठीच्या पहिला मोसमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. आता दुसऱ्या पर्वातही महेश मांजरेकरच सूत्रसंचालन करताना दिसतील. दरम्यान, मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचा पहिला पर्व ऑनएअर गेला होता. पण यंदा शो कधी लॉन्च करायचा याची तारीख ठरवण्याबाबत निर्माते गोंधळात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला आहे. पण यावर अजूनही काम सुरु असल्याचं कळतं.