पणजी : महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबई आणि परिसरात चालू असलेली सगळी चित्रिकरणं तातडीने महाराष्ट्राबाहेर गेली. त्यात गोवा हे राज्य अग्रेसर होतं. हिदी-मराठी मालिका, सिनेमे, वेबसीरीज यांची अशी 30 चित्रिकरणं गोव्यात चालू असतानाच 'सूर नवा ध्यास नवा' या रियालिटी शोच्या सेटवर गोव्यातल्या फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी धडक दिली आणि तिथलं चित्रिकरण थांबवलं. अनेक प्रश्न त्यावेळी तिथे उपस्थित झाले. त्यानंतर मात्र गोवा सरकारने तातडीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. 


गोव्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग, वाढणारं मृत्यूचं प्रमाण पाहता चित्रिकरण थांबवावं असा सूर त्या राज्यात वाढू लागला. या चित्रिकरणांना स्थानिकांचा विरोधही होऊ लागला. एकिकडे गोव्याचा भूमीपुत्र आपले सगळे व्यवहार बंद ठेवत असताना महाराष्ट्रातून आलेल्या मनोरंजनसृष्टीला ही परवानगी कशी मिळेत असाही सूर वाढू लागला. म्हणून एंटरटेन्मेटं सोसायटीने चित्रिकरणाला दिलेली परवानगी रद्द केली. त्यानंतर मात्र राज्यात चालू असलेल्या 30 चित्रिकरणांना ब्रेक लागला. 


या सर्व युनिट्सना आता पुढे काय ही चिंता सतावू लागली. सगळ्यांनी आपली मातृसंस्था असलेल्या आयएफटीपीसी अर्थात इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलकडे धाव घेतली. चित्रिकरण कुठं करावं, कसं करावं की पुन्हा महाराष्ट्रात जावं अशा शंकांमध्ये ही मंडळी अडकली आहेत. शिवाय, उद्या दमण, सिल्वासा आदी ठिकाणी चित्रिकरणाची व्यवस्था जरी झाली तरी राष्ट्रीय लॉकडाऊनची शक्यता आहेच. तसं असेल तर सर्वच चित्रिकरणवाल्यांनी परत महाराष्ट्रात सही सलामत येऊन थांबावं असाही विचार प्रोड्युसर्स कौन्सिल करतं आहे. पण त्यासाठी त्यांना चॅनलशी बोलावं लागणार आहे. म्हणून शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता ही बैठक होते आहे. या बैठकीत प्रोड्युसर्स कौन्सिलचे चार सदस्य सहभागी होणार आहेत. चॅनलच्या शिष्टमंडळापैकी किती लोक यात असतील ते अद्याप कळलेलं नाही. प्रोड्युसर्स कौन्सिलतर्फे कोणतंही विधान करण्याला असमर्थता दर्शवली. 


संध्याकाळच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय़ घेतले जाणार आहेत. यामध्ये गोव्यातल्या युनिट्सनी सिल्वासा, दमण, उंबरगाव या ठिकाणी जावं का.. जायचं असेल तर तिथे राहायची, चित्रिकरणाची व्यवस्था होऊ शकेल का, तिथे गर्दी होईल का आदी अनेक गोष्टींची शहानिशा यावेळी केली जाणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :