मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पडद्यावर पदार्पण करणारी आणि बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये फर्स्ट रनर अप ठरलेली हिना खानवर फसवणुकीचा आरोप लागला आहे. 8.25 लाख रुपयांचे दागिने परत न केल्याने एका ज्वेलरने तिला कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

संपूर्ण प्रकरण 21 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्डशी संबंधित आहे. बिग बॉसमध्ये बेस्ट एन्टरटेनर ठरल्याने तिला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

आधी ठरलेल्या करारानुसार, या सोहळ्यासाठी हिना खानला एका ज्वेलरने स्पॉन्सर केलेले 11.11 लाख रुपयांचे दागिने घालायचे होते. हिनाने सगळे दागिने तर घेतले. पण त्यापैकी केवळ 2.86 लाख रुपयांचेच दागिने परत केले. तिने 8.25 लाख रुपयांचे दागिने अजूनही परत केलेले नाहीत.

आणखी एक बाब म्हणजे इव्हेंटच्या दिवशी काही कारणामुळे हिनाने आरोप करणाऱ्या ज्वेलरचे दागिने घातले नव्हते. पण सतत सांगूनही हिना खानने 8.25 लाखांचे दागिने अजूनही परत केलेली नाही. नाईलाजाने हिना खानला नोटीस पाठवल्याचं ज्वेलरने सांगितलं. ही नोटीस 16 जुलै रोजी हिना खानच्या घरच्या पत्त्यावर पाठवली आहे.

"मात्र मला कोणाकडूनही कोणतीही नोटीस आतापर्यंत मिळालेली नाही," असं हिना खानने स्पष्ट केलं. "या प्रकरणी माझी स्टायलिस्ट हेमलताने तिच्या असिस्टंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण प्रकरणात माझ्यावर कोणताही आरोप केलेला नाही. त्यामुळे माझ्यावर दागिने परत न केल्याचा आरोप कोण कसा काय करु शकतो," असं हिना खान म्हणाली.

"या गुन्ह्याची एक कॉपी माझ्याकडेही आहे. माझी स्टायलिस्ट उगाचच मला क्लीन चिट तर देणार नाही ना? कारणाशिवाय माझी बदनामी केली जात आहे," असंही हिना खान म्हणाली.