'लिटील थिएटर' ही बाल रंगभूमीसाठीची चळवळ सुधा करमरकर यांनी स्थापन केली होती. त्याचप्रमाणे आविष्कार, छबिलदास चळवळीत ही अग्रस्थानी होत्या. दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत त्यांनी रंगभूमीची सेवा केली.
सुधा करमरकर यांचं घराणं मूळ गोव्याचं असलं, तरी त्यांचा जन्म मुंबईत 18 मे 1934 साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगावातील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाताईंना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळालं होतं.
वयाच्या 18 व्या वर्षी त्या भरतनाट्यममध्ये पारंगत झाल्या. त्यानंतर मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशल नायिकेची म्हणजे रंभेचीच भूमिका मिळाली, आणि ती भूमिका गाजली.
नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन 'बालरंगभूमी' या संकल्पनेचा अभ्यास केला. साहित्य संघाच्या सहकार्याने 'बालरंगभूमी-लिट्ल थिएटर' सुरु केलं.
सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील खरंखुरं पहिलं बालनाट्य सादर केलं. रत्नाकर मतकरी यांनी हे नाटक लिहिलं होतं.
सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. 1959 साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाट्याने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाची सुरुवात झाली.
सुधा करमरकरांच्या गाजलेल्या भूमिका आणि नाटकं :
- अनुराधा (विकत घेतला न्याय)
- उमा (थँक यू मिस्टर ग्लॅड)
- ऊर्मिला (पुत्रकामेष्टी)
- कुंती (तो राजहंस एक)
गीता (तुझे आहे तुजपाशी)
- सुधा करमरकरांनी दिग्दर्शित केलेली बालनाट्य :
- चिनी बदाम
- कळलाव्या कांद्याची कहाणी (नाटककार रत्नाकर मतकरी)
- मधुमंजिरी (नाटककार रत्नाकर मतकरी)
- हं हं आणि हं हं हं (नाटककार दिनकर देशपांडे)
- गणपती बाप्पा मोरया
- अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा (नाटककार)
- जादूचा वेल (नाटककार सुधा करमरकर)
- अलीबाबा आणि चाळीस चोर