मुंबई : मोबाईलमुळे नाटकाच्या प्रयोगात येणाऱ्या व्यत्ययाबाबत प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी संताप व्यक्त केला आहे. 'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाच्या प्रयोगदरम्यान अनेकांचे मोबाईल वारंवार वाजल्यामुळे सुमीत यांनी प्रयोग थांबवला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुमीत राघवन यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली आहे.


काय घडलं होतं?

नाशिकमधील महाकवी कालिदास रंगमंदिरात 'नॉक नॉक सेलिब्रेटी' नाटकाचा प्रयोग सुरु होता. वेगवेगळ्या प्रेक्षकांचा मोबाईल त्या प्रयोगाला वाजला होता. एक व्यक्ती दरवाजा उघडून प्रेक्षागृहातून आत-बाहेर करत असताना दार दरवेळी आदळत होतं आणि मोठा आवाज येत होता. एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला 'अहो हळू बोला' असं म्हणाल्यावर‌ ती बाई दाराबाहेर जाऊन बोलू लागली, मात्र ते बोलणंही स्टेजवर एकू येत होतं. शेवटी पहिल्या रांगेतील एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि सुमीत यांनी चिडून नाटक बंद केलं.

यापूर्वीही हाच अनुभव

नाशिकमध्येच 'एक शून्य तीन' नाटकाचा प्रयोग सुरु होता, तेव्हा एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला. मी आणि स्वानंदी टिकेकर स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने 'तुमचं चालू द्या' असं केलं आणि मी स्तब्ध झालो, असं सुमीत राघवन यांनी सांगितलं.

तिकीट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करुन घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच, तशा बकाल नाट्यगृहात काम करा, वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा, अशा शब्दात सुमीत राघवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी विक्रम गोखले, आस्ताद काळे यासारख्या नाट्य कलाकारांनीही मोठमोठ्याने वाजणारी मोबाईल रिंग, प्रेक्षकांची फोनवर बडबड यासारख्या कारणांमुळे प्रयोग थांबवले होते. नाट्यप्रयोग सादर करताना कलाकारांना एकाग्रतेची आवश्यकता असते. मात्र बेपर्वा प्रेक्षकांमुळे कलाकारांना तादात्म्य होण्यास कठीण जाते आणि पर्यायाने इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. प्रत्येक नाट्यगृहात प्रयोग सुरु होण्यापूर्वी फोन बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असूनही त्याकडे कानाडोळा होताना दिसतो.