मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली, तशी स्पर्धकांची भांडणं, हेवेदावे, थोडक्यात 'राडा'ही सुरु झाला. 'देवयानी' फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच मेघा धाडेच्या विजयाचं श्रेय घेतलं. मात्र आपल्याकडून टिप्स घेतल्याचा शिवानीचा दावा मेघा धाडेने फेटाळून लावला आहे.

शिवानी सुर्वेने देवयानी, सुंदर माझं घर, जाना ना दिल से दूर यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. अभिजीत बिचुकलेसोबत घडणारी तू-तू-मै-मै असो, किंवा शेफ पराग कान्हेरेसोबत झालेली वादावादी, बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून शिवानी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी शिवानीने वेगळाच दावा केला होता. 'माझ्यामुळे मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली, माझ्या मार्गदर्शनामुळे ती जिंकली. तिचे घरातील कपडे आणि स्टाईल बाबतही मीच सल्ला दिला होता' असं म्हणत शिवानीने मेघाच्या विजयाचं श्रेय घेतलं.

मेघाने मात्र शिवानीचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. शिवानी आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे सगळे जण तिला विचारत होते, की तिने बिग बॉसच्या घरात शिरण्यापूर्वी माझ्याकडून काही सल्ले घेतले आहेत का? त्यामुळे वैतागलेल्या शिवानीने कदाचित उपहासाने उत्तर दिलं असावं, की तीच माझी गुरु आहे, असं म्हणत मेघाने शिवानीची बाजू सावरुन धरली आहे.

'मी कोणाकडूनही टिप्स घेतल्या नव्हत्या. मुळात बिग बॉस मराठीचा पहिलाच सिझन असल्यामुळे कोणालाच आधी त्याबाबत तर्क लढवता आले नव्हते.' असंही मेघा म्हणाली.

ढॅण्टॅढॅण | 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी मेघा धाडे हिच्याशी खास गप्पा


मेघाचे फेवरेट कोण?

अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेते विद्याधर जोशी अर्थात बाप्पा यांचा खेळ आपल्या आवडतो. 'रोडिज्' फेम शिव ठाकरे आपला फेवरेट स्पर्धक असल्याचं मेघा म्हणाली. शिवला खुलण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. मला वाटतं तो लंबी रेस का घोडा आहे, असंही मेघाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

अभिजीत बिचुकलेबद्दल काय म्हणते मेघा?

अभिजीत बिचुकले हा काही मृदूभाषी नाही. पण याचा अर्थ त्याला टार्गेट केलं जाता कामा नये. तो लक्ष केंद्रित करुन घेण्यासाठी खेळत नाहीये. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे कॅमेरेच त्याला फॉलो करत आहेत, असं मेघाला वाटतं.

सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे-वीज, मैथिली जावकर, वैशाली माडे, अभिजीत केळकर, अभिजीत बिचुकले यासारखे तगडे कलाकार यंदा बिग बॉसच्या पर्वात दिसत आहेत. नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचक्के, शिवानी सुर्वे, रुपाली भोसले यासारखे तरुण चेहरेही बिग बॉसचा भाग आहेत.