मुंबई : लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता श्रेयस तळपदे बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. एका मराठी मालिकेतून श्रेयस पुनरागमन करणार आहे.  नुकताच झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिकेच्या प्रोमोमधून श्रेयस तळपदे झळकला. याशिवाय श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे स्क्रिन शेअर करणार आहे. श्रेयस आणि प्रार्थना यांचा मुख्य अभिनय असलेली आगामी मालिका 'तुझी माझी रेशीमगाठ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा लाडका कलाकार श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.  श्रेयसने मराठी प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत देखील आपली उत्तम कामगिरी पार पाडली. 'आभाळमाया', 'अवंतिका', 'दामिनी', 'बेधूंद मनाची लहर' यांसारख्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये आपल्या चांगल्या अभिनयाने सिनेसृष्टीत अस्थित्व निर्माण केले. 'सावरखेड एक गाव', 'पछाडलेला' या चित्रपटातून श्रेयसला बरीच पसंती मिळाली.  2005 साली बॉलीवूड मधील 'इक्बाल' या सिनेमातून श्रेयसने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'ओम शांती ओम', 'गोलमाल' या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आपली चमक दाखून दिली. बराच काळ झाला, श्रेयस तळपदे कोणत्याच भूमिकेत आपल्यला दिसून आलेला नाही, त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर श्रेयस परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 



टेलिव्हिजनच्या झी मराठी या वाहिनीवर 'तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून बऱ्याच कलाकारांनी कौतुक करत कमेंट केल्या आहेत. ही एक आगळीवेगळी प्रेमकथा असणार आहे.  श्रेयस तळपदेसोबत प्रार्थना बेहरे ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा नुसताच प्रोमो रिलीज झाला असून या मालिकेची वेळ अद्यापही स्पष्ट झालेली नाही आहे. मात्र आता या मालिकेची उतसुकता सर्वांना लागली आहे.


श्रेयसने इंस्टावर पोस्ट शेअर लिहिलं... 


श्रेयस तळपदेनं इंस्टाग्रामवर या मालिकेचा प्रोमो शेअर करत असं लिहलं आहे की, "मी बराच काळ माझ्या चाहत्यांपासून दूर राहू शकत नाही, तुमच्या या प्रेमासाठी मी लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. इच्छा करतो यातील माझी भूमिका तुम्हाला नक्की आवडेल."