मुंबई : रविंद्रनाथ टागोर... भारताचे पहिले नोबेल विजेते. रवींद्रनाथ टागोर यांना 'गीतांजली' या काव्यसंग्रहासाठी नोबेलने गौरवण्यात आलं होतं. टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रचलेल्या 'एकला चलो रे' या गाण्याच्या अॅकापेला व्हर्जनमधून त्यांना आदरांजली देण्यात आली आहे. नवोदित गायक-संगीतकार ऋषभ गोखले याने हा आगळावेगळा प्रयोग केला आहे.


पारतंत्र्य काळात रवींद्रनाथांनी अनेक काव्य रचली. या काव्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात झोकून देणाऱ्या लढवय्यांना प्रेरणा मिळाली. 'एकला चलो रे' हे त्यातलंच एक काव्य. 1905 साली टागोरांनी हे काव्य लिहिलं. मात्र 112 वर्ष उलटल्यानंतरही ते शब्द प्रेरणादायी ठरत आहेत.

रवींद्रनाथ यांची आणखी एक बाजू बऱ्याच जणांना माहित नाही, ती म्हणजे त्यांचं संगीत. रवींद्रसंगीत या नावाने ते ओळखलं जातं. एकला चलो रे ही रवींद्रनाथांच्या गीतंबीतन या काव्यसंग्रहातली रचना. स्वदेशी चळवळीच्या काळात लिहिलेल्या 22 विद्रोही कवितांपैकी रवींद्रनाथांनी रचलेल्या 2 कवितांमधली ही एक कविता.

'एका' या शीर्षकाखाली 1905 साली भांडार या नियतकालिकात ही कविता पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. नेमकी नोंद नाही पण 1905 ते 1908 या काळात हे गाणं रविंद्रनाथांच्या आवाजात रेकॉर्ड केला गेलं. त्यानंतर हे गाणं संगीत क्षेत्रातल्या अनेकांना खुणावत आलं आहे. अगदी अलिकडेच ए आर रेहमान यांनी बांधलेल्या चालीवर अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हे गाणं आपण ऐकलं होतं.



या गाण्याला यापूर्वी कोणीच अॅकापेला (acapella) स्वरुपात बांधलं नव्हतं. ऋषभ गोखले या नवोदित गायक संगीतकाराने हा प्रयोग केला आहे. गाण्याच्या मूळ संहितेला हात ना लावता एका वेगळ्या स्वरुपात हे गाणं ऋषभने साकारलं आहे.

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणतीही वाद्य वापरण्यात आलेली नाहीत. यातील सर्व वाद्यांचे आवाज ऋषभने स्वतः तोंडाने काढले आहेत. आणि रवींद्रनाथांना त्यांच्या जयंती निमित्त ही अनोखी संगीत आदरांजली वाहिली आहे.

विशेष बाब म्हणजे हा व्हिडिओ 'एकला चालो रे' या शब्दांना पूर्ण न्याय देतो. आपल्या आवाजासाहित ऋषभ गोखले याने एकट्याने सर्व पैलू हाताळले आहेत - संगीत संयोजन, रेकॉर्डिंग, शूट (हो, तेही एकट्यानेच) व्हिडीओ एडिटिंगही. हा संपूर्ण व्हिडीओ स्मार्टफोनवर शूट करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ :