मुंबई: इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक कॉन्सर्टसाठी भारतात येत आहे. 10 मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील  स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.


मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने जस्टिन बिबरने मागण्यांची एक भली मोठी यादीच पाठवली आहे.

व्हाईट फॉक्स इंडियाने जस्टिन बिबरची जी 'डिमांड लिस्ट' जारी केली आहे, ती वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

काय आहे डिमांड लिस्ट?

  1. 5 स्टार हॉटेलमध्ये 13 रुम बुक करा. सुरक्षेच्या कारणास्तव एक नव्हे तर 2 फाईव्ह स्टार हॉटेल बुक करा.

  2. जस्टिन बिबरच्या ड्रेसिंग रुममधील सर्व पडदे पांढरे शुभ्र हवे. त्याच्या रुममध्ये काचेचा फ्रीज हवा



  1. जस्टिन बिबरच्या खोलीत पाण्याच्या 24 बाटल्या, एनर्जी ड्रिंकच्या 4, व्हिटॅमिन वॉटरच्या 6 बाटल्या, 6 क्रीम सोडा आणि विविध फळांचा रस



  1. खाण्यामध्ये विविधता असावी, त्यासाठीही मोठी यादी पाठवली आहे. त्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा समावेश आहे.



  1. हेल्थ फूडच्या नावे नारळ पाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, शुद्ध देशी मध, केळी आणि हर्बल टीसह ताजी फळं



  1. जस्टिन बिबरच्या जवळपास कुठेही लिलीची फुलं दिसू नयेत



  1. जस्टिन बिबरच्या संपूर्ण टीमसाठी विविध साईझचे टी-शर्ट



  1. जस्टिन बिबरचा ताफा नेण्यासाठी 10 लग्झरी कार, 2 वॉल्वो बस



  1. या ताफ्याला सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पथक हवं

  2. याशिवाय बिबरचे 8 सुरक्षा गार्डही त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतील.



  1. जस्टिन बिबर परफॉर्म करण्यासाठी हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत रस्तेमार्गे नाही तर चॉपर (हेलिकॉप्टर) ने जाणार



  1. जस्टिन बिबर ज्यावेळी प्रवास करेल, त्यावेळी 10 कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल. यामध्ये त्याचा सोफा सेट, प्ले-स्टेशन, वॉशिंग मशीन आणि टेबल-टेनिसचं टेबल यासारख्या साहित्याचा समावेश आहे.


जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टसाठी हजारोंमध्ये तिकीटाचा दर आहे. या तिकिटांसाठी चाहते अक्षरश: गर्दी करत आहेत.

ईएमआयवर तिकीट

जस्टिन बिबरच्या 10 मेच्या शोसाठी तिकीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी तिकीट 5040 रुपये आहे, तर प्लॅटिनम तिकीट 15400 पर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे ही तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचंही बोललं जात आहे.



भारतीय कलाकारांचा परफॉर्मन्स

या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही परफॉर्म करणार आहे. मात्र त्याला गायक कैलाश खेर, अरमान मलिक आणि सोना महापात्रसारख्या अनेक दिग्गजांनी विरोध केला आहे.

पॉप सिंगरसोबत परफॉर्म करण्यासाठी प्रशिक्षित गायकांनाच निमंत्रण द्यायला हवं, असं या दिग्गजांचं म्हणणं आहे.

कोण आहे जस्टिन बिबर?

बेबी...बेबी... हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही.

जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांचा जस्टिन बिबरचा जन्म कॅनडात 1994 मध्ये झाला.

जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.



इतकंच नाही तर एकेकाळी जस्टिन बिबरसोबत सेल्फी काढण्यासाठी 2000 डॉलर अर्थात लाखापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागत.

जस्टिन बिबरने मानाचा ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने त्याला तीन वेळा जगातील सर्वात पॉवरफुल्ल सेलिब्रिटी म्हणून गौरवलं आहे.



गेल्या 5 वर्षात जस्टिन बिबर हे नाव सातत्याने ऐकायला मिळालं. पूर्वी लोक हे नाव ऐकून न ऐकल्यासारखं करायचे, मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत.

 जस्टिन बिबरकडे डिजीटल मीडियातील एक सक्सेस स्टोरी म्हणून पाहिल जातं. कारण 2008 मध्ये त्याचे काही यूट्यूब व्हिडीओ समोर आले आणि एका टॅलेंट मॅनेजरने त्याचे पाय पाळण्यात ओळखले.

जस्टिन बिबरचा 2010 मध्ये एक स्टुडिओ अल्बम रिलीज झाला आणि तो रातोरात स्टार झाला.