मुंबई: मुलुंडच्या आर मॉलमध्ये एका टीव्ही कलाकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मयुर लाड असं या कलाकाराचं नाव असून ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकेत त्यांनं काम केलं आहे.


3 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मयुर लाड आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना मद्यधुंद तरुणांनी मारहाण केली. मॉलच्या सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 गुंडांना अटक केली असून आणखी दोन जण फरार झाले आहेत.

धक्कादायक म्हणजे ही मारहाण होत असताना मयुर लाडची पत्नी आणि नाट्य कलाकार पनवेलकर यांनी 100 नंबरवर फोन लावला असता त्यांना योग्य ते सहकार्य मिळालं नाही.



३ एप्रिलच्या रात्री १२च्या सुमारास अभिनेता मयुर लाड त्याची पत्नी आणि दोन नाट्य कलाकार हे मुलुंडच्या आर मॉल मधील हॉटेलमधून बाहेर पडत होते. मॉलच्या आतील एस्कलेटरजवळ मयुर आणि त्याचे मित्र सेल्फी काढत असताना चार तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या चार तरुणांनी मयुर लाड आणि त्याच्या मित्र मैत्रिणींना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात मॉलमधील सुरक्षा रक्षक आल्यानं मद्यधुंद अवस्थेतील चार तरुण मॉलच्या बाहेर पळून गेले. पण हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. तर या चौघांनी फोन करुन त्यांच्या इतर मित्रांना बोलावून घेतलं आणि मॉलच्या पार्किंगमध्ये पुन्हा मयुर आणि त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मयुर लाडनं आजवर छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिका

- मयुर लाडने झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये पाठक बाईंचा मित्र कल्पेशची भूमिका साकारली आहे.

-'जय मल्हार'मध्ये वायूकिची भूमिका केली आहे.

- कलर्स मराठी वरील 'गणपती बाप्पा मोरया' मालिकेत काशी राजाची भूमिका साकारली आहे.

- सावधान इंडिया, लक्ष्य, क्राईम पेट्रोल, मन मैं हे विश्वास यासारख्या मालिकेतही त्यानं भूमिका साकारल्या आहेत.