मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'च्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ अद्याप कायम आहे. सुनील ग्रोव्हरसोबतचा वाद, घसरलेला टीआरपी, चॅनेलने कपिलला दिलेलं अल्टिमेटम हे सगळं ताजं असतानाच, आता शोमधील महत्त्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंह सिद्धू वादात सापडले आहेत.
पंजाबचे कॅबनेट मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी द्विअर्थी विनोद केल्याचा आरोप आहे. सिद्धूंनी अश्लिल आणि द्विअर्थी विनोद केल्याने, वरिष्ठ वकील एचसी अरोडा यांनी पंजाबच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.
अरोडा यांचे आरोप
पत्नी आणि मुलीसोबत कपिलचा शो पाहात होतो. त्यावेळी सिद्धूंच्या आक्षेपार्ह विनोदामुळे भावना दुखावल्या, असं अरोडा यांनी म्हटलं आहे.
अरोडा यांच्या तक्रार अर्जात शोमधील काही विनोदांचा उल्लेख केला आहे. हे विनोद अभद्र आणि द्विअर्थी असल्याचा त्यांचा दावा आहे.
इतकंच नाही तर अरोडा यांनी पंजाब सरकारला मंत्रिपद आणि आचारसंहितेची आठवण करुन दिली. तसंच हे प्रकरण पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यापर्यंत पोहोचवण्याचीही मागणी केली आहे.
सिद्धूने माहिती आणि प्रसारण कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा अरोडा यांनी केला आहे. तसंच याप्रकरणी हायकोर्टातही जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सिद्धूंचं स्पष्टीकरण
दरम्यान, सिद्धूंनी अरोरा यांचे आरोप फेटाळले आहेत. जर या शोमध्ये अश्लिलता असती, तर हा शो लोकप्रियतेमध्ये अव्वल नसता, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर लोक फळं लागलेल्या झाडाला दगड मारतातच, असं टोलाही लगावला.
हायकोर्टात याचिका
दरम्यान, एच सी अरोरा यांनी मंत्री असलेल्या सिद्धू यांच्या शोमधील सहभागावरच आक्षेप घेतला आहे. त्याबाबत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी झाली, त्यावेळी हे मंत्र्यांच्या नैतिकतेचं उल्लंघन नाही का? असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. तसंच पंजाब सरकारला नोटीसही पाठवली होती.
याप्रकरणी पुढील सुनावणी 11 मे रोजी होणार आहे.