Dipika Chikhlia On Ramayana Movie And Sai Pallavi: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood Movie) चर्चा रंगलीये नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाची. रणबीर कपूर स्टारर 'रामायण' (Ramayana Movie) सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी 'रामायण' सिनेमाच्या भव्यतेची चर्चा तर देशभरात सुरू आहेच, पण त्यासोबतच 'रामायण'च्या स्टारकास्टचीही (Ramayana Movie Starcast) चर्चा रंगली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर, साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा चर्चेत असतानाच 1987 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांची एक मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत बोलताना दीपिका चिखलिया यांनी सिनेमात सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया आजही कोट्यवधी लोकांसाठी 'सीता माता' आहे. अलिकडेच, नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. यावर दीपिका यांनी अमर उजालाशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. दीपिका यांनी चित्रपटाच्या विजुअल्सचं कौतुक केलं आहे. पण, त्याच वेळी मोठं बजेट आणि तंत्रज्ञानाच्या काळात रामायणातील खऱ्या भावना हरवल्या जातील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
"टीझर भव्य, पण आत्मा दिसतंच नाही..."
दीपिका चिखलिया म्हणाल्या की, "खरं सांगायचं तर, मला व्हिज्युअल इफेक्ट्स चांगले वाटतात. पण, माझं स्वतःचं मत असं आहे की, 'रामायण' हे फक्त ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञान नाहीये. ती भावनांची कथा आहे. टीझर पाहिल्यानंतर मला कथेचा अंदाज आला नाही, पण मला नक्कीच वाटलं की ते खूपच आधुनिक दिसतंय. लायटिंग, रंगांचे टोन्स... सगळं थोडं आधुनिक वाटलं."
पुढे बोलताना दीपिका म्हणाल्या की, "जेव्हा मी 'रामायण' केलं तेव्हा तंत्रज्ञान खूप मर्यादित होतं, पण लोक त्याच्याशी मनापासून जोडले गेले होते. आता मी पाहिलेल्या टीझरमध्ये भव्यता आहे, पण मी वाट पाहत आहे की, त्यात त्या भावना आहेत की नाही."
"रणबीरला पाहिलं... अन् अरुण गोविल आठवले..."
जेव्हा दीपिका यांना विचारलं गेलं की, रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत कसे वाटले? तेव्हा त्या म्हणाल्या की, "जेव्हा मी रणबीरला राम म्हणून पाहिलं, तेव्हा मला लगेच अरुण गोविल यांची आठवण झाली. रामच्या जागी मी कदाचित कधीच दुसऱ्या कोणालाही पाहू शकणार नाही. ते गेल्या 35-40 वर्षांपासून आमच्यासाठी प्रभू श्रीराम आहेत.'
"साई पल्लवी माझ्यापेक्षा वेगळी असेल, पण सीतेची भूमिका चांगली करेल"
सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला कास्ट करण्याबाबत दीपिका म्हणाल्या की, "साई पल्लवी खूप गुणी अभिनेत्री आहे. मी तिचे मल्याळम चित्रपट पाहिलेत. तिचा अभिनय खूप नॅचरल आहे. मला विश्वास आहे की, ती सीतेची भूमिका चांगली साकारेल. हो, ती माझ्यापेक्षा वेगळी असेल, पण ती तिचं काम चांगले करेल."
"ओळखीच्या चेहऱ्याला देव म्हणून स्वीकारणं सोपं नाही..."
दीपिका म्हणाली की, जेव्हा तिनं 'रामायण'मध्ये काम केलं, तेव्हा लोक तिला खरोखरच देवी म्हणून पाहू लागले. ती म्हणाली, "आजही लोक मला आणि अरुणजींना राम-सीता मानतात. फरक एवढाच आहे की, जेव्हा आम्ही आलो, तेव्हा आम्ही पूर्णपणे नवे चेहरे होतो. लोक आम्हाला त्या रूपात स्वीकारू शकले. पण आजच्या कलाकारांनी आधीच अनेक पात्रं साकारली आहेत, त्यामुळे लोकांना त्यांना देव म्हणून स्वीकारणं थोडे कठीण जाऊ शकतं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :