Prathamesh Parab On Director Lakshman Utekar: 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'बालक-पालक' सिनेमातून (Balak-Palak Movie) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता प्रथमेश परबला (Actor Prathamesh Parab) कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रथमेश परबनं आजवर अनेक हिट सिनेमे केले, पण त्याला खरी ओळख मिळाली ती, 'टाईमपास'मुळे. या सिनेमातली प्रथमेशनं साकारलेली 'दगडू'ची भूमिका विशेष गाजली. कॉमेडी असो किंवा गंभीर भूमिका, प्रथमेश प्रत्येक पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. आता सध्या तो त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रथमेश परबचा 'गाडी नंबर 1760' सिनेमा नुकताच रिलीज झाला. यावेळी एका मुलाखतीत बोलताना प्रथमेश परबनं 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना सॉरी म्हटलं आहे, तसेच यावेळी तो काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
'गाडी नंबर 1760' निमित्तानं मटा कट्ट्यावर प्रथमेश परब आला होता. त्यावेळी त्यानं 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना इंडस्ट्रीत मिळालेल्या चुकीच्या वागणुकीवर भाष्य केलं. तसेच, यावेळी त्यानं त्यांच्या स्ट्रगल आणखी उलगडून सांगितला आणि मराठी सिनेसृष्टीतील काही मुद्द्यावर बोटंही ठेवलं. तसेच, लक्ष्मण उतेकर यांना सॉरी म्हणताना प्रथमेश काहीसा भावूकही झाला.
'महाराष्ट्र टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रथमेश परब म्हणाला की, "लक्ष्मण उतेकर हे जेव्हा मराठी इंडस्ट्रीत आले, तेव्हा त्यांना योग्य व्यासपीठच मिळालं नाही. इतका मोठा दिग्दर्शक असूनही मराठीत त्यांना कोणी साथ दिली नाही." पुढे बोलताना प्रथमेश परब म्हणाला की, "आमच्या सगळ्यांच्या वतीने इंडस्ट्रीच्या वतीने मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. ते मराठीत आले तेव्हा त्यांना सिनेमासाठी खूप झगडावं लागलं. मी त्यांना भडकताना पाहिलंय. त्यांच्यासाठी मला खूप भारी वाटतंय की, त्यांना 'छावा' नावाचा सिनेमा केला आणि दाखवून दिलं की, मी आहे... तो स्ट्रगल करुन आलाय माणूस, त्यांच्याकडेच्या स्टोरी खूप भारी आहेत... ते असेच फिरायचे मुंबईत असताना... 'छावा'सारखा दमदार सिनेमा मराठीत करायचा प्रयत्न केला, पण पैसे आणि मर्यादांमुळे तो हिंदीत गेला."
हातात डबा घेऊन फोटोग्राफरकडे असिस्टंट म्हणून काम करणारा माणूस... : प्रथमेश परब
मुलाखतीत बोलताना प्रथमेश भावूक झाला आणि म्हणाला की, "मला त्यांच्या संघर्षाचं वाईट वाटतं. हातात डबा घेऊन फोटोग्राफरकडे असिस्टंट म्हणून काम करणारा माणूस आज मोठा दिग्दर्शक झाला आहे. पण आम्हीच त्याला ओळखू शकलो नाही. मराठी जे सो कॉल्ड एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर स्वतःला समजणाऱ्यांनी त्यांना उभं नाही केलं, फार वाईट गोष्ट आहे ही..."
साऊथवाले लेखक-दिग्दर्शकांना जपतात, आपण मात्र... : प्रथमेश परब
प्रथमेश परबनं पुढे बोलताना साऊथ फिल्म्सचं उदाहरण दिलं. तो म्हणाला की, ""ते त्यांच्या लेखक-दिग्दर्शकांना जपतात. म्हणूनच त्यांचे सिनेमे आज ओटीटीवरही गाजतात. आपण मात्र अशा रत्नांना गमावतो. ‘मुंज्या’सारखा सिनेमा मराठीत सहज होऊ शकला असता, पण बजेटअभावी गमावला."