Tejshri Pradhan : जान्हवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं प्रेम मिळवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejshri Pradhan) ही प्रेमाची गोष्ट या मालिकेतून सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकाविश्व, मोठा पडदा, रंगभूमी अशा अनेक माध्यमांतून तेजश्री कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण या अभिनेत्रीच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक कठिण काळ आला होता. तेजश्रीच्या आईचं निधन झालं. पण तेजश्रीच्या आयुष्यातली सध्या आईची उणीव तिची ऑनस्क्रिन आई भरुन काढत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण तेजश्रीने तिच्या आईसाठी केलेल्या पोस्टवर शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांच्या पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतलं.
तेजश्रीची आईसाठी पोस्ट
अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या आईसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने एक पुस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर केला असून तिच्यासोबत तिची आई देखील आहे. या पोस्टवर तेजश्रीने कॅप्शन दिलं आहे की, आई… 6 महिने झाले..पाठीशी आहेस ना अशीचं ! रहा.. कायम. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याचप्रमाणे तिला धीर देखील दिल्याचं पाहायला मिळतंय. पण या पोस्टवरील शुभांगी गोखलेंच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळतंय.
शुभांगी गोखलेंची कमेंट
तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शुभांगी गोखले या माधवी गोखले ही भूमिका साकारत आहे. माधवी गोखले या मुक्ता गोखलेच्या आई आहेत. त्यामुळे तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले या ऑनस्क्रिन मायलेकीच्या जोड्या आहेत. याच ऑनस्क्रीन आईने तिच्या लेकीला धीर दिल्याचंही पाहायला मिळतंय. तेजश्रीच्या आईच्या पोस्टवर शुभांगी गोखले यांनी कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शुभांगी गोखले यांनी म्हटलं की, 'ती बघते आहे.. आणि माझ्यासारख्या अनेकांना तुझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितलंय..'
तेजश्री प्रधानने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. 'होणार सून मी ह्या घरची' ही तिची मालिका चांगलीच गाजली. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.