पुणे : पुणे, शिरुर आणि मावळमध्ये 13 मे ला मतदान (Pune Polling day 2024) पार पडलं. मतदान पार पडताच सगळ्या उमेदवारांनी आपल्या विजयाचे दावे करायला सुरुवात केली आहे. त्यात कार्यकर्त्यांकडून थेट बॅनर्सदेखील लावण्यात येत असून शुभेच्छ्या द्यायला सुरुवातदेखील झाली आहे. निकाल चार जूनला लागणार असला तरीही सेलिब्रेशन सुरु झालं आहे. मावळमध्ये (Maval Loksabha election) महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या संजय वाघेरेंचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे. निकालापूर्वीत मावळ लोकसभेत कार्यकर्त्यांचा हा असा आततायीपणा पाहायला मिळत आहे.
मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात तगडी लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी जीव तोडून मेहनत केली आहे. त्यात दोघांनीही मावळच्या हिताचे मुद्दे मांडले आणि मावळकरांना विकास करण्याचा विश्वास दर्शवला. दोघांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षातील पहिली फळी कामाला लागली होती. अनेकांनी सभा घेतल्या मोठ-मोठे रोड शो झाले. दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांकडून विजयासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर मतदान पार पडलं आणि आता थेट विजयाचे बॅनर्स लागले आहेत.
मावळ लोकसभेत माझा विजय एक लाख 72 हजार 704 मतांनी होईल, असा विश्वास मविआचे उमेदवार संजोग वाघेरेंनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी विधानसभा निहाय मताधिक्याचा लेखाजोखा मांडला. यात सलग दोनवेळा खासदार झालेल्या श्रीरंग बारणेंना फक्त पनवेलमधून लीड मिळेल, असा दावा वाघेरेंनी केला.
पुण्यात मुरलधीर मोहोळांचे बॅनर
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं असून 4 जून रोजी त्याचा निकाल लागेल. पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. आता या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्या पुढेही जात थेट आपल्या नेत्यांचे भावी खासदार असं होर्डिंग लावल्याचं दिसतंय. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे भावी खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत. त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याचं दिसतंय. पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून वसंत मोरे हे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पण मुख्य लढत ही काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच असल्याचं सांगितलं जातंय.
इतर महत्वाची बातमी-
बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?