Tanvi Azmi : 'बाजीराव मस्तानी', 'लय भारी' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री तन्वी आझमी (Tanvi Azmi) या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत येतात. आतापर्यंत अनेक सिनेमे, नाटकं, वेब सिरिज यांसारख्या माध्यमातून तन्वी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कायम वेगळ्या आशयाच्या भूमिका आणि कसोशीचा अभिनय यामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या होत्या. तसेच तन्वी आझमी या मुळच्या महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांनी लग्न वेगळ्या धर्मात केलं आहे. यामुळे तन्वी आझमी यांना बऱ्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तन्वी आझमी यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आझमीसोबत लग्न केले आहे.
तन्वी आझमी या लवकरच दिल दोस्ती डिलेमा या सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरिजमध्ये त्या अनुष्का सेनसोबत झळकणार आहे. तसेच या सिनेमात अनुष्का सेन ही मुख्य भूमिकेत दिसणार असून तन्वी आझमी या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आजी आणि नातीलमधील जनरेशन गॅप आणि त्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर, तन्वी आझमी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.
तन्वी आझमी यांनी नेमकं काय म्हटलं?
तन्वी आझमी यांनी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याने त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागल्याचं त्यांनी म्हटलं. एक महाराष्ट्रीयन ब्राम्हण मुलगी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे समाजाकडूनही तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. त्यांना या मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला की, त्या लहानपणापासूनच बंडखोर आहेत का? त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, मी एक आज्ञाधारक मुलगी होते, पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि संपूर्ण मुंबई संतप्त झाली. कारण एका ब्राम्हण महाराष्ट्रायीन मुलीने एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले होते. त्या सगळ्यांसाठी जग संपल्याची भावना होती. त्यानंतर माझ्याविरोधात सगळीकडे बंडखोरी सुरु झाली होती, जी कधीच संपली नाही.
'अशा कुटुंबाचा भाग बनून खूप छान वाटतं'
बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तन्वी आझमी या इंडस्ट्रीतल्या एका प्रसिद्ध घराण्याशी जोडल्या गेल्या आहेत. कवी कैफ, शौकत आझमी, शबाना आझमी, जावेद अख्तर ही त्यांच्या कुटुंबातील मंडळी आहेत. अशा कुटुंबाशी जोडलं गेल्याने इंडस्ट्रीत दडपण येतं का? यावर बोलताना तन्वी आझमी यांनी म्हटलं की, 'मला अशा कुटुंबाचा भाग बनून खूप छान वाटतं. इतरांनी जे मिळवलं आहे, तेच मीही मिळवण्याची गरज आहे, असं मला या कुटुंबाने कधीही वाटू दिलं नाही.'