Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित असून, आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एक नवा विषय घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पण असं असलं तरीही सिनेमाला थिएटरच मिळत नसल्याचं चित्र सध्या आहे. यावर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तेजश्रीने लोकमत फिल्मीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावर तिने मराठी सिनेमांसाठी स्वतंत्र्य सिनेमागृह आता व्हायलाच हवीत अशीही मागणी केलीये. ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी एकत्र पाहायला मिळत आहे. पण सध्या चित्रपटगृहांसाठी या सिनेमाची धडपड सुरु असल्याचं चित्र आहे.
तेजश्रीने काय म्हटलं?
सिनेमाला पुरेसे स्क्रिन्स मिळत नाहीत, यावर प्रतिक्रिया देताना तेजश्रीने म्हटलं की, मला अनेकांचे फोन येत आहेत. सिनेमा पाहायचा आहे, पण जवळच्या चित्रपटगृहात सिनेमा लागलेलाच नाही. ही गोष्ट खूपच वाईट आहे. यामध्ये प्रेक्षकांचंही अगदी बरोबर आहे. मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाला पाहायला बाहेर पडत नाहीत, असंच आपण म्हणतो. पण जर तो सिनेमा थिएटरमध्ये लागलेलाच नसेल तर ते प्रेक्षक तरी काय करणार? असंच चित्र असेल तर मराठी सिनेमा चालणार तरी कसा? याच गोष्टीची मोठी खंत वाटते. जिथे मराठी प्रेक्षक राहतात तिथल्या थिएटरमध्येही सिनेमा लागला नसणं हे खरंच दुर्दैव आहे. इतका पाठपुरवठा केल्यानंतर आज आम्हाला विलेपार्ले येथे एक शो मिळाला.
पुढे तेजश्रीने म्हटलं की, 'मराठी सिनेमांसाठी स्वतंत्र्य थिएटर्स असावीत, अशी मागणी जवळपास सगळेच कलाकार करत आहेत. आता ही गरजच झालीये. त्यातच आता स्पर्धाही वाढलीये. आता हिंदीसोबतच दाक्षिणात्य सिनेमाही स्पर्धेत आहे. ते सिनेमेही पाहावेतच. पण यामध्ये मराठी सिनेमा मागे पडता कामा नये. त्यासाठी स्वतंत्र थिएटर मिळाले तर अशा प्रकारे 'स्क्रीन द्या' असं म्हणायची वेळच येणार नाही.'
दरम्यान यावेळी तेजश्रीने तिच्या ती सध्या काय करते सिनेमावरही भाष्य केलं आहे. तेजश्रीला या सिनेमावर विचारलं असता ती म्हणाली की, 'ती सध्या काय करते हा सिनेमा 2017 मध्ये आला आणि तो प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनीही खूप गर्दी केली होती. पण तो काळ मराठी सिनेमांसाठी चांगलाच होता. कारण त्याच्या आधीच सैराट सिनेमा आला होता आणि तो तुफान चालला होता.'
ही बातमी वाचा :