The Secret Of Shiledar Teaser Out: छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास आणि महाराजांच्या काळातील एका रहस्यावर (Chhatrapati Shivaji Maharaj History) आधारित असलेली नवी वेब सीरिज 'द सिक्रेट ऑफ शिलेदार' (The Secret Of Shiledar) ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) डिस्नी + हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) झळकणार आहे. तर, मराठमोळे कलाकार दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिज मध्ये अभिनेते आशिष विद्यार्थीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'द सिक्रेट ऑफ शिलेदार' या वेब सीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला असून त्यात एक सिक्रेट संघटना दाखवण्यात आली आहे. टीझरच्या सुरुवातीला अनेक गूढ नकाशे दाखवण्यात आले असून ही सिक्रेट संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिन्याचं रक्षण करते, असं दाखवलं गेलं आहे. राजीव खंडेलवालनं साकारलेल्या पात्राला या संघटनेचा प्रमुख म्हणून त्या संघटनेत घेतलं जातं. या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना आणि त्यांच्या काळातील चलन दाखवण्यात आलं आहे. महाराजांच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी राजीव खंडेलवालचं पात्र काय-काय करतं, याची एक झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. यात अनेक अॅक्शन सीन्स सुद्धा आहेत.
रुपेरी पद्यावर 'मुंज्या' सारखा चित्रपट साकारणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यानं या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 'द सिक्रेट ऑफ शिलेदार' 31 जानेवारी 2025 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या वेब सीरिजबाबत बोलताना आदित्य सरपोतदार म्हणाले की, "लहानपणापासून आजवर साहसी व ऐतिहासिक कथांनी माझे नेहमी लक्ष वेधून घेतले आहे, माझ्या मनात अशा कथांबाबत नेहमी उत्सुकता असायची. अशाच उत्सुकतेमधून 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'ची निर्मिती झाली आहे. संरक्षक असलेल्या ‘शिलेदार’ची संकल्पना यापूर्वी सादर करण्यात आलेली नाही, ज्यामुळे ही सीरिज रंजक असणार आहे."
मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता राजीव खंडेलवाल वेब सीरिजबाबत बोलताना म्हणाला की, "मला विश्वास आहे की, इतर कोणी नाही तर 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'नं मला निवडलं. अशी वेगळी आणि बहुआयामी भूमिका साकारण्याबाबत माझ्या मनात शंका होती, पण आदित्य यांनी सर्वकाही सोपे आणि सुरळीत केलं. इतिहासाप्रती उत्सुकता असलेल्या बहुतांश व्यक्तींप्रमाणे मी देखील आदित्य सरपोतदार यांनी पटकथेचं वर्णन केल्यानंतर भारावून गेलो आणि माझ्यामध्ये अशा धमाल आणि माहितीपूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करण्याची उत्सुकता जागृत झाली."
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, "मला मराठ्यांची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सादर करणाऱ्या कथानकाचा भाग असण्याचा आनंद होत आहे. मी बालपणापासून अनेक कथा ऐकत आले आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कथा ऐकून मला अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रख्यात आहे आणि याच कारणामुळे मी या प्रकल्पाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा होती. मला ही संधी देण्यासाठी डिस्नी+ हॉटस्टारचे मनापासून आभार व्यक्त करते."