Swara Bhaskar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar Group) विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhaskar) नवरा फहाद अहमद (Fahad Ahmed) यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. याच मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या मैदानात आहेत. त्यामुळे अणुशक्तीनगरच्या या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, फहाद अहमद यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने शरद पवारांचे आभार मानले आहेत. 


फहाद अहमद यांच्यावर समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी होती. त्यामुळे फहाद अहमद हे याच मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण या जागेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात येणार होता. त्यानंतर फहाद अहमद हे समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


स्वरा भास्करने मानले शरद पवारांचे आभार!


दरम्यान नवऱ्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने शरद पवारांचे आभार मानले आहेत. स्वराने एक्स पोस्ट करत म्हटलं की, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव आणि अबु आझमी यांचे मनापासून आभार... तुमच्या पदरी निराशा येणार नाही, असं म्हणत स्वराने शरद पवारांना विश्वासही दिला आहे. 


अणुशक्तीनगर मतदारसंघात 2019 साली काय झालं?


अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक 65,217 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दोघांमधील विजयाचे अंतर 12,751 मतं एवढं आहे.  तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे 39,966 मते मिळवून विजयी झाले होते. 






ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : सूरजच्या घराचा भूमीपूजन सोहळा; अजित पवारांचे मानले आभार, म्हणाला,'दादांचे काळजापासून...'