Suraj Chavan :  बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi Season 5) ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. अजित दादांनी यावेळी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर अजितदादा आणि सूरजची भेट झाली होती. त्यानंतर आता सूरजच्या गावात त्याच्या नव्या घरासाठी भूमीपूजनही करण्यात आलं आहे. 


यावेळी सूरजच्या घरातील त्याची आत्या,बहिण देखील उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे त्याच्या गावातील इतर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी सूरजने त्याच्या भावना व्यक्त करत अजित पवारांचे आभारही मानले आहेत.काही प्रशासकीय अधिकारी देखील सूरजच्या घराच्या भूमीपूजनासाठी उपस्थित होते. सूरजचं घर नऊ महिन्यांमध्ये पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 


'दादांचे काळजापासून आभार..'


सूरजने भूमीपूजनानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, घराचं स्वप्न पूर्ण होतंय.. मला खूप बरं वाटतंय, आनंद झालाय.. अजित दादांनी सांगितंल होतं, तुझं स्वप्न मी पूर्ण करेन आणि ते स्वप्न आता पूर्ण झालंय. दसऱ्याला त्यांनी मला हे सांगितलं होतं, आज मी माझ्या हस्ते भूमीपूजन केलंय. दादांचे काळजापासून आणि मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यासारख्या गरीब मुलाला मदत केली, त्यांचे खूप आभार.. 


कसं असणार सूरजचं घर?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनंतर सूरजच्या गावामध्ये त्याच्यासाठी घर बांधून दिलं जाणार आहे. त्यानंतर येत्या 9 महिन्यांमध्ये सूरजचं घर तयार होईल अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दोन बेडरुम, हॉल, किचन आणि बाहेर मोठा वऱ्हांडा असं या घराचं स्वरुप असेल. त्याचप्रमाणे 2000 स्केवअर फुटामध्ये या घराची बांधणी केली जाणार आहे. यामध्ये एक मास्टर बेडरुम देखील असणार आहे. तसेच पार्किंगसाठीही व्यवस्था केली जाईल.  






ही बातमी वाचा : 


Vidya Balan: विद्या बालनला नव्हती आवडली 'भुल भुलैय्या-2' ची स्क्रिप्ट? सिनेमा न करण्याचं अभिनेत्रीने सांगितलं कारण