मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात मुंबई उपनगरातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतून स्वीकृती शर्मा इच्छुक होत्या. स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघात तशी तयारी देखील केली होती. मात्र, ऐनवेळी स्वीकृती शर्मा यांचं नाव मागं पडलं आणि भाजपच्या मुरजी पटेल यांचं नाव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून निश्चित होणार असल्याची माहिती आहे.मुरजी पटेल यांचं नाव आघाडीवर असल्यानं स्वीकृती शर्मा यांनी काल त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.


स्वीकृती शर्मा यांनी 30 जुलै 2024 रोजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अंधेरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी तयारी सुरु केली होती.  वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभेची तयारी सुरु केली होती. अखेरच्या टप्प्यात उमेदवारीच्या शर्यतीत नाव मागं पडल्यानं त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्वीकृती शर्मा अपक्ष लढणार


स्वीकृती शर्मा यांनी पीएस फाऊंडेशनच्या शेकडो सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता.  माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी शिवसेना शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा साठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या. अंधेरी पूर्व विधानसभा मुरजी पटेल यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा बंड करून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत.  


प्रदीप शर्मा यांनी काल दुपारी 12 वाजता आपला समर्थकांची बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीमध्ये त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे.


पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, मुरजी पटेल यांची माघार


शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल लढणार होते. मात्र, ऐनवेळी मुरजी पटेल यांनी माघार घेतली होती. आता या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, स्वीकृती शर्मा या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. 


दरम्यान, महायुतीकडून मुंबईतील काही जागांवरील अंतिम उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेले नाहीत. महायुतीकडून आज जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होऊ शकतो. 


इतर बातम्या : 


भावाची भावकी झाली, लेकासाठी बाप उतरला मैदानात; श्रीनिवास पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ