Swapnil Joshi : गुजराती सिनेमा (Gujarati Movie) हा आता मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) स्वागतासाठी सज्ज झालीये. कारण 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत स्वप्नील पदार्पण करतोय. "शुभचिंतक" अस या चित्रपटाचं नाव आहे. स्वप्नील हा कायमच मराठी आणि हिंदी माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता तो गुजराती सिनेमामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
स्वप्नीलने 2024 वर्षात बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे. त्यातच आता येणाऱ्या नव्या वर्षात स्वप्नील प्रेक्षकांना एका नव्या गुजराती सिनेमात दिसणार आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.
सिनेमात 'हे' कलाकार झळकणार
या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित, ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ते हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं सांगतात.
स्वप्नीलने काय म्हटलं?
या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला की, 'गुजराती चित्रपट वेगाने पुढे जातोय. वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येत आहे.सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं निमित्तानं करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे.'