Ranjitsinh Mohite Patil: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रणजीतसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार रणजितसिंह पाटील यांना नाटीस पाठवली आहे. तसेच या नोटीसवर सात दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देखील रणजीतसिंह पाटील यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार, कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करतं पक्षाचे आभार मानले आहेत. 


रणजीतसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यायला हवा. खरंच त्यांना लाज वाटत असेल ना...आपण ज्या देवाभाऊंच्यामुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला, असं म्हणत रणजीतसिंह पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या या मागणीला यश आल्याचं बोललं जात आहे.


रणजीतसिंह पाटील यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये नेमंक काय म्हटलंय?


प्रति, रणजीतसिंह मोहिते पाटील आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र 


विषय- पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस... 


आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक विषयात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 


1) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारात्ताठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती. 


2) लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपाच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले. 


3) पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपाच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले. 


4) आपल्या कार्यकरर्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनात आले. 


5) लोकसभा निवडणूक मतदानाध्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपा विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले. 


6) विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचे निदर्शनास आले. 


7) महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबीय कडून आपण राष्ट्रवादी शरदबंद्र पवार गटाचा प्रचार केला तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले.


8) पोलिंग एजंटला आपल्या कार्यकत्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील सात दिवसात लेखी स्वरुपात सादर करावे...




नेमकं प्रकरण काय?


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उघड प्रचार केला होता. लोकसभेला त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचा पराभव केला होता. मोहिते पाटील कुटुंबाने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून हकालपट्टीची मागणी केली होती. 


संबंधित बातमी: 


जहाँ वाल्मिक कराड खडा, वहाँ सरकारसेही बडा...; देशमुख हत्या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले तो माझ्या जातीचा...