Allu Arjun कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. कलाविश्वालाही या संसर्गानं विळख्यात घेतलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना याबाबतची माहिती देत आपल्या प्रकृतीची चिंता न करण्याची विनंती केली. सोबतच आपली प्रकृती लवकरच सुधारेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. 


कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्यानं विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेत, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्यानं कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.  योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याची विनंती करत, कोरोना लसीकरण मोहिमेतही सहभागी होण्याची विनंती केली. 










अल्लू अर्जुन यानं सोशल मीडियावर आपण कोरोनाबाधित झाल्याचं सांगताच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थनेचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. कोणी, गेट वेल सून म्हणत त्याला धीर दिला, तर कोणी त्याला या युद्धात जिंकण्यासाठी सदिच्छा दिल्या. या लोकप्रिय कलाकारापोटी चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यांचे संदेश सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले होते. 


देशातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेत टाकणारा 


संपूर्ण जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशातच भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 360,960 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी सोमवारी देशात 323,023 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.