पणजी : गोव्यातील विन्सन वर्ल्ड निर्मित अक्षय इंडीकर दिग्दर्शित स्थलपुराण या मराठी सिनेमाचे प्रतिष्ठित बर्लिन महोत्सवातील चारही शो हाउसफुल्ल झाले आहेत. चित्रपट प्रेमी आणि समीक्षकांनी स्थलपुराणचे तोंडभरून कौतुक देखील केले. चित्रपटाचे निर्माते संजय शेट्ये आणि दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना दोनवेळा रेड कार्पेटचा सन्मान देखील मिळाला आहे.


प्रतीक वत्स यांचा 'एब आले ऊ!', पुष्पेंद्र सिंग यांचा 'लैला और सात गीत' आणि अक्षय इंडीकर यांचा 'स्थलपुराण – जुनाट जागा' या तीन चित्रपटांची यंदा भारतातर्फे बर्लिन महोत्सवासाठी निवड झाली होती. यातील स्थलपुराणला जागतिक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अक्षय इंडीकर यांचा मराठी चित्रपट 'स्थलपुराण' हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला जातो. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत.



बर्लिन येथून बोलताना स्थलपुराणचे निर्माते संजय शेट्ये म्हणाले, तब्बल 15 हजार सिनेमांमधून स्थलपुराणची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. 26 फेब्रुवारी रोजी स्थलपुराणचा वर्ल्ड प्रीमियर झाला. त्यानंतर 27, 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी रोज एक याप्रमाणे स्थलपुराणचे एकूण चार शो दाखवण्यात आले. हे सर्व शो हाउसफुल्ल झाले. 26 आणि 29 फेब्रुवारीच्या शो वेळी आम्हाला रेड कार्पेटचा सन्मान मिळाला. हा फक्त आमचा नव्हे तर सर्व गोमंतकीयांचा सन्मान होता. स्थलपुराणला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत.

स्थलपुराणच्या प्रदर्शनानंतर जागतिक चित्रपट प्रेमी आणि समीक्षकांनी चित्रपटाचा विषय आणि त्याची मांडणी याचे तोंडभरून कौतुक केल्याचे सांगून शेट्ये म्हणाले, इफ्फीमध्ये एनएफडीसीचा फिल्म बाजार असतो तशाच धर्तीवर बर्लिन महोत्सवात युरोपियन फिल्म मार्केट असतं. यात सहभागी जवळपास 10 जणांनी स्थलपुराण विकत घेण्याची इच्छा दाखवली आहे.



बर्लिन महोत्सवात स्थलपुराणचा वर्ल्ड प्रीमियर झाल्यामुळे कान्समध्ये धडक देऊन तिथे वर्ल्ड प्रीमियर करण्याची संधी हुकली असली तरी टोरांटो आणि बुसान या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यात नक्की आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी व्यक्त केला आहे.

इंडीकर म्हणाले, आम्ही स्थलपुराणसाठी घेतलेली मेहनत सार्थकी लागली. स्थलपुराणच्या शो नंतर झालेली प्रश्नोत्तरे तब्बल पाऊण तास रंगली. सिनेमाचा विषय आणि त्याची मांडणी हटके झाली असून त्याची दखल बर्लिन महोत्सवात घेतली गेल्यामुळे आमचे स्वप्न सत्यता उतरले असल्याचा आनंद आम्हाला झाला आहे.