ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी कायम राखली आहे. या खराब कामगिरीमुळे टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. रविवारचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची अवस्था सहा बाद 90 अशी झालीये. टीम इंडियाला 97 धावांची आघाडी मिळाली आहे. दिवसभराचा खेळ संपेपर्यंत हनुमा विहारी 5 आणि रिषभ पंत 1 धाव करत नाबाद आहेत.
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने तीन तर टिम साऊदी, कोलीन दे ग्रँडहोम आणि नील वॅगनर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 24 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ पृथ्वी शॉ आणि कर्णाधार विराट कोहलीने प्रत्येकी 14 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने 9, मयंक अगरवालने 3, उमेश यादवने 1 धाव केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडच्या पाच विकेट घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडची स्थिती आठ विकेटवर 188 धावा अशी होती. मात्र काईल जॅमिसन आणि नील वॅगनर यांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 235 धावापर्यंत मजल मारली.
न्यूझीलंकडून टॉम लॅथमने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्यानंतर नवव्या क्रमांकाव खेळायला आलेल्या काईल जॅमिसने 49 धावांची खेळी केली. टॉम ब्लनेलने 30, कोलीन दे ग्रँडहोमने 26, नील वॅगनर 21, रॉस टेलरने 15 आणि हेन्री निकोल्सने 14 धावांची खेळी केली. त्यामुळे गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुनही काईल जॅमिसन आणि नील वॅगनर खेळीमुळे टीम इंडियाला अवघ्या 7 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4, जसप्रीत बुमराहने 3, रविंद्र जाडेजाने 2 आणि उमेश यादवने एका खेळाडूला माघारी धाडलं.
त्याआधी पहिल्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 242 धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून काईल जॅमिसननं 45 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीनं झळकावलेल्या अर्धशतकांनी भारतीय डावाला आकार दिला. त्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांची मजल मारली.
इतर बातम्या
ICC Test Ranking | विराट कोहलीला मागे टाकत स्टीव्ह स्मिथची अव्वल स्थानी झेप
Laureus world sports awards : सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातील सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान