Smita Deo Emotional Post on Seema Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांनी 24 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच सीमा देव यांची सून स्मिता देव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आता त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव, दोन सुना, नातवंडं आहेत. स्मिता देव यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.


काय आहे स्मिता देव यांची पोस्ट?


स्मिता देव यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आई-बाबा गमावणं हे स्वीकारणं खूप अवघड असतं. पण माझी सासू माझ्या आईपेक्षा कमी नव्हती. ती खरोखर माझी सर्वात जवळची मैत्रीण होती. जेव्हा मी अभिला डेट करत होते. तेव्हा त्यांना वाटलं होतं की, मी बांद्र्यातील मुलगी आहे म्हणजे खूप आधुनिक विचारांची असेन. ही आपल्या कुटुंबात कसे काय जुळवून घेईल. मात्र काही काळानंतर माझे आणि अभीचे लग्न झाले. त्यानंतर त्यांना माझ्याबद्दल असणाऱ्या सर्व शंका मी दूर केल्या. मग आम्ही दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी झालो. त्या नेहमी म्हणायच्या, मला एक मुलगी होती. पण ती कुठेतरी हरवली होती, पण आता ती मला तुझ्या रुपात मिळाली आहे. आम्ही दोघी अभिनयची कामावरुन घरी येण्याची वाट पाहत बसलेल्या असायचो. तेव्हा त्या सासू-सूनेच्या मालिका पाहायच्या आणि मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहायचे. त्या माझ्या डोक्यावरुन हात फिरवायच्या आणि मग दिवसभराचा सर्व थकवा नाहीसा होऊन जायचा. आम्ही एकत्र भाजी, किराणा माल, फळे हे सगळे आणायला जायचो. आजही मी दादरलाच जाते. तिथले लोक आईंची चौकशी करण्यासाठी लगेच येतात."






पुढे त्यांनी लिहिले आहे, "दुपारचे जेवण आम्ही सोबतच करायचो. मग झोपण्यापूर्वी त्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी मला सांगायच्या. बालपणीच्या गोष्टी, त्यांनी केलेला संघर्ष, त्या बाबांना (रमेश देव) कशा भेटल्या? आमचे सर्वात धाकटे प्रताप काका म्हणायचे वहिनी माझी आई आहे. तिने फक्त आपल्या मुलांवर प्रेम केले नाही तर ती आपल्या भाची-पुतण्यांवरही प्रेम करत होती. अभिनय आणि मी जेव्हा वेगळे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता आणि माझ्यासाठी देखील हे कठीण होते. आम्ही दोघांना आमच्याबरोबर राहण्यास सांगितलं. पण त्यावेळी त्या दोघांना त्यांचा कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा होता, असं मला वाटतं होतं. मात्र शेवटी त्यांच्यावर अशी एक वेळ आली जेव्हा त्या स्वतःला ओळखण्यासाठी धडपड करु लागल्या. तिच्यासाठी अभिनय हा तिचा दादा होता आणि मी ओळखीची व्यक्ती म्हणून मला चिकटून राहायच्या. स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे जिथे तुम्हाला डोळे झाकून अनोळखी लोकांच्या खोलीत सोडल्यासारखे वाटते."


इतर महत्वाच्या बातम्या


Dharmaveer 2 : हिंदुत्वाची व्याख्या बदलायला लावणारा 'धर्मवीर 2'; प्रवीण तरडेंची एबीपी माझाला माहिती