Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सावरत श्रेयसने महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjarekar) ही अनोखी गाठ या चित्रपटातून कमबॅक केलंय. श्रेयसच्या या कठिण काळात त्याची पत्नी दीप्ती (Dipti Talpade) ही त्याच्यासोबत पावलोपावली होती. दरम्यान त्याच्या आयुष्यातील ह्यात प्रसंगावर नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) कविता सादर केली.
अमेय वाघ ही कविता सादर करताना उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. तसेच ही कविता ऐकून श्रेयसही भावूक झाला. त्याच्या शेजारी असलेली त्याची पत्नी दीप्तीच्याही डोळ्यात यावेळी पाणी आलं. दरम्यान अमेयने सादर केलेली ही कविता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतेय. तसेच अनेकांनी कमेंट्स करत या कवितेला पसंती दर्शवल्याचंही पाहायला मिळतंय.
अमेयने सादर केली कविता
अमेयने सादर केलेल्या या कवितेमध्ये म्हटलं की, “संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे….. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.”
श्रेयसच्या आयुष्यातला तो कठीण काळ
डिसेंबर 14 रोजी श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) वेलकम 2 या चित्रपटाचं शूटींग सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या क्षणापासून माझं सारं आयुष्य बदललं असं म्हणत श्रेयसने त्याच्या या अनुभवाविषयी माझा कट्ट्यावरही भाष्य केलं. श्रेयसचा हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबला होता. त्याचं हृदय बंद पडलं होतं. पण झुकेगा नही म्हणत श्रेयस त्या जीवघेण्या संकटातून, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलाय. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर तो क्लिनिकली डेड होता. या सगळ्यात दिप्तीने, श्रेयसच्या बायकोने त्याला प्रचंड खंबीर साथ दिलीये आणि श्रेयसही म्हणतो की त्याला मिळालेला नवा जन्म दिप्तीमुळेच आहे.