Sharmishtha Raut : मालिका, सिनेमे यांसह बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने (Sharmishtha Raut) आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नुकतच तिने निर्मिती केलेला नाच गं घुमा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निर्माती म्हणूनही शर्मिष्ठा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण अभिनेत्री म्हणून अनेकदा असे काही प्रसंग येतात, ज्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित होतात. अभिनेत्रींसाठी कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. असाच काहीसा अनुभव शर्मिष्ठाला देखील आला आहे.
शर्मिष्ठाने नुकतच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. यावेळी शर्मिष्ठाने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्री म्हणून कोणती ऑडिशन यावेळी लक्षात राहणारी ठरली असा प्रश्न शर्मिष्ठाला विचारण्यात आला. त्यावर शर्मिष्ठाने तिच्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. शर्मिष्ठा ही सिनेमांसह मालिकांच्या देखील निर्मिती क्षेत्रात आहे. त्याचप्रमाणे मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतील तिची खलनायिकेची भूमिका विशेष गाजली.
शर्मिष्ठाने सांगितला तिचा अनुभव
स्पेशल ऑडिशन हे चांगलंही असतं आणि वाईटही असंत, असं तुझं कोणतं? यावर शर्मिष्ठाने म्हटलं की, 'चांगलं ऑडिशन म्हणजे अर्थातच मन उधाण वाऱ्याचे. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यासाठी असते त्याच्यासाठीची प्रोसेस ही घडायला लागते. मन उधाण वाऱ्याचेच्या बाबतीत असंच घडलं. दुसरा अनुभव म्हणजे, एक वाईट ऑडिशन होती. म्हणजे ती ऑडिशन चांगली झाली होती. मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव घेणार नाही किंवा ते मराठी होतं की हिंदी हेही नाही सांगणार. त्या ऑडिशननंतर मला प्रोडक्शन हाऊसने कॉम्प्रमाईजसाठी विचारलं होतं. हे ही घडतं, कारण कास्टिंग काऊच हा प्रकार घडतो. हाच प्रकार घडला. तेव्हा मी त्यांना धन्यवाद म्हटलं. एकवेळ मी घरी बसेन, नोकरी करेन तेवढी सुशिक्षित मी नक्कीच आहे, पण हे असलं काही मला जमणार नाही. '
माझा स्वभाव हा फटकळ आहे - शर्मिष्ठा राऊत
'माझं जे काही मत असतं ते मी स्पष्टपणे मांडते. त्यामुळे फटकळ म्हणजे असं नाही की लोकांना मला दुखवायचं असतं, पण जे काही आहे ते मी तोंडावर सांगते. त्यामुळे अनेकदा मी रुड आहे, गर्विष्ठ आहे,असं लोकांना वाटतं. माझे काही मित्र मैत्रीणही सांगतात, की तू अभिनेत्री आहेस, आणि तु असं कसं पटकन बोलू शकतेस. पण मला नाही असं वागायला नाही जमत, त्यासाठी मी लोकांची थोडाबीत देखील खाल्ली आहे. उंच माझा झोकाच्या दरम्यान', असा अनुभव शर्मिष्ठा राऊतने सांगितला.