Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
Sayaji Shinde on Tree Cutting: झाडांवर कुऱ्हाड; टोरंट कंपनीच्या प्रोजेक्टसाठी वृक्षतोड? सयाजी शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांना केली कळकळीची विनंती

Sayaji Shinde Opposes Tree Cutting: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात (Karjat Tree Cutting) सध्या टोरंट पॉवर कंपनीसाठी (Torrent Power Company) होणाऱ्या वृक्षतोडीवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राजकीय नेत्यांसह काही पर्यावरण प्रेमींनी या विरोधात आपला रोष व्यक्त केला. तसेच सरकार विरोधात आपला निशाणा साधला. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. या प्रकरणात अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. सह्याद्रीचं वाळवंट करायचं आहे का? अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कर्जतच्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यभरातून टीका केली जातेय. यावरुन सह्याद्री देवराई माध्यमातून पर्यावरणसाठी काम करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे यांचा संताप, नेमकं काय म्हणाले? (Sayaji Shinde Opposes Tree Cutting for Torrent Power Project)
कर्जतमध्ये टोरेंट पॉवर कंपनीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर एबीपी माझाशी बोलताना सयाजी शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. सयाजी शिंदे म्हणाले की, 'भारतातील जंगल जमीन जी आहे, त्यातील 5 टक्के जंगल जमीन आपल्या सह्याद्रीत आहे. तेथून अनेक नदी वाहतात. तेथून आपलं महाराष्ट्र जगत आहे. त्या झाडांमुळे आणि डोंगरांमुळे पाऊस येतो. त्याच्यावरचे प्रोजेक्ट येतायेत, त्यातील पहिलं प्रोजेक्ट म्हणजे टोरेंट प्रोजेक्ट. 600 एकर जमीन दिली जाते. त्यातील झाडं तोडली जातात'.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करुन सांगतो की, त्यांनी जर 71 कोटींची इन्व्हेस्टमेंट आणि 30 हजार कोटींचा काय तरी फायदा, निर्माण होणारी वीज, हे कुणाला? त्या झाडांना? तेथील प्राणी, मोर, तेथील पाणी, तेथील 50 प्रकारचे मासे... त्यांच्या बाजूने मला उभं राहायचं आहे. त्यानंतर माणसांच्या बाजूनं उभं राहायचं आहे. या सगळ्यांचं नुकसान करुन पर्यावरण घालवून असले प्रोजेक्ट कशाला करायचे? मुळात आपण आता 5 टक्क्यांवर आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण सह्याद्री म्हणतो, त्या सह्याद्रीचं मुख्यमंत्र्यांना 25 प्रोजेक्ट तयार करुन वाळवंट करायचं आहे का? सगळं काही संपवायचं आहे का?', असं सयाजी शिंदे म्हणाले.
'मुख्यमंत्री आणि आपण निवडून दिलेल्या नेत्यांनी सगळ्यांनी पर्यावरण जपलं पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की, तुम्ही इथल्या प्राणी, पक्षी, जीव, झाडे यांची बाजू घ्या. कायद्यात बदल करा. निसर्गाला नका फसवू, आपण आपल्यालाच फसवतोय. माझी मुख्यमंत्री आणि फॉरेस्ट मिनिस्टरला विनंती आहे, नियम बदला, कायद्यात बदल करा. झाडी तोडू नका. तुम्हाला जे प्रोजेक्ट करायचे ते करा. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे. सर्वांनी पेटून उठा. आपल्या डोळ्यादेखील सह्याद्रीचं वाळवंट करायचं नाहीये...', असं सयाजी शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















