Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: 'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...
Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: ठाण्यात एक भव्य दहीहंडी उत्सवात प्रताप सरनाईकांनी अभिनेता संजय दत्त याला गोविंदांशी मराठीतून बोलण्याची विनंती केलेली, तेव्हा त्यानं जाहीरपणे नका दिलेला. पण, आता संजय दत्तला उपरती झाली असून त्यानं यू-टर्न घेतलाय.

Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: राज्यभरात दहीहंडीचा (Dahi Handi 2026) उत्साह पाहायला मिळाला. अनेक राजकीय नेतेमंडळींनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आणि त्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) उपस्थिती लावलेली. पण, अशाच एका दहीहंडी सोहळा आणि त्या मंचावर उपस्थित असलेल्या संजय दत्तची (Sanjay Dutt) जोरदार चर्चा झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी आयोजित केलेल्या दंहीहंडी सोहळ्यासाठी संजय दत्त उपस्थित होता. याच मंचावर त्यानं मराठीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे मात्र संजूबाबा वादाच्या भोवऱ्यात अडकला. मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला (Bollywod Actor Sanjay Dutt) मराठी (Marathi Language) बोलण्याची विनंती केली, पण संजय दत्तनं जाहीरपणे तसं करण्यास नकार दिला. संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे मराठी भाषेबाबत (Marathi Language) सुरू असलेल्या वादानं एक नवं वळण घेतलं. पण, आता मात्र संजूबाबाला त्याची चूक कळाली असून त्यानं युटर्न घेतलाय.
IANS नं दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता संजय दत्त यानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून 'दहीहंडी' कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आणि ते वक्तव्य केवळ गंमतीनं केल्याचं सांगितलं. तसेच, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, असं म्हणत त्याबद्दल माफीही मागितली.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त नेमकं काय म्हणाला? (Sunjay Dutt On Marathi Language)
आयएनएसच्या रिपोर्टनुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असतानाच त्यांच्या फोनवर अचानक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा कॉल आला. फोन उचलताच अभिनेत्यानं कोणतीही औपचारिकता न ठेवता थेट मराठीत बोलायला सुरुवात केली. प्रताप सरनाईकांनी फोन उचलताच, 'प्रताप भाई, जय महाराष्ट्र….' अशी मराठीतून बोलायला संजय दत्तनं सुरवात केली. तसेच, ठाण्यात दहीहंडी कार्यक्रमात घडलेल्या संपूर्ण प्रसंगावर दिलगिरी व्यक्त केली.
प्रताप सरनाईकांशी पुढे बोलताना संजय दत्त म्हणाला की, "दहीहंडी कार्यक्रमात आपण केवळ मस्करी करत होतो, मी जे काही बोललो ते केवळ एका हलक्याफुलक्या विनोदाच्या ओघात बोलून गेलो होतो... मला चांगलं मराठी येतं. माझ्या बोलण्यानं काही चुकीचा संदेश गेला असेल किंवा कोणाच्याही स्वाभिमानाला धक्का पोहोचला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. माझे कुटुंबीय हे मुंबईकर आहोत. मी याच मातीत वाढलो असून, महाराष्ट्रानं मला भरभरून दिलंय... माझ्या संपूर्ण आयुष्यात मला जे काही मिळाले आहे, ते केवळ या महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानंच मिळालंय..."
यावेळी बोलताना संजय दत्तनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही आठवण काढली. "माझ्या कठीण काळात साहेब माझ्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते...", असं संजय दत्त म्हणालाय.
दहीहंडी सोहळ्यात संजय दत्त मराठी भाषेबाबत काय बोललेला? (Sanjay Dutt Marathi Language Controversy)
ठाण्यातील (Thane News) शिवसेना (शिंदे गट) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच, संजय दत्त उपस्थित होता. यावेळी बोलण्यासाठी संजय दत्तनं माईक हातात घेतला आणि तो हिंदीत बोलू लागला. त्यावेळी प्रताप सरनाईकांनी त्याला थांबवलं आणि मराठीत बोलण्याची विनंती केली. पण, संजय दत्तनं तसं करण्यास स्पष्ट नकार दिला. संजय दत्तनं हलक्या-फुलक्या सुरात म्हटलं की, "मी येरवडा तुरुंगात सहा वर्षे घालवलीत, तरीही मला मराठी शिकता आली नाही..."
संजय दत्तच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या. संजय दत्तला अनेकांनी ट्रोलही केलं. संजय दत्त यांनं केलेलं वक्तव्य जरी विनोदाच्या सूरात केलेलं असलं, तरी त्यामुळे आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय दत्तनं हे वक्तव्य अशावेळी आलंय, ज्यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागानं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं मूलभूत किंवा व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य केलंय. त्यामुळे प्रताप सरनाईकांसमोरच संजय दत्तनं असं वक्तव्य केल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















