Somy ali on sushant singh rajput : बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) सध्या बरेच मोठे खुलासे करत आहे. सलमानविषयीही तिने अनेक गौप्यस्फोट केलेत. त्यातच आता तिने नुकतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येविषयी देखील एक मोठा खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचा दावा सोमी अलीने केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच खळबळ माजलीये.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लॉकडाऊनच्या काळात गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरणही बरंच तापलं होतं. तसेच या प्रकरणात अनेकांना अटकही करण्यात आली होती. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा दावा हा तेव्हाही करण्यात आला होता. पण सोमीने आता केलेल्या दाव्यामुळे तिने एम्सच्या डॉक्टरांवरही गंभीर आरोप केले आहेत.
सोमीने नेमकं काय म्हटलं?
सोमीने नुकतच तिच्या चाहत्यांसोबत रेडिटवर आस्क मी हे सेशन घेतलं. त्यावेळी तिला सुशांतच्या आत्महत्येविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोमीने म्हटलं की, त्याची हत्या झाली होती आणि ती हत्याच आत्महत्या म्हणून दाखवण्यता आली. तुम्ही हे एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांना विचारु शकता, ज्यांनी सुशांतच्या ऑटोप्सीचे रिपोर्ट्स बदलून टाकले... सोमी अलीच्या या दाव्यामुळे सध्या सोशल मीडियावरही बरीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय.
'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होता. रंगभूमीवर काम करत असताना त्याने बालाजी टेलीफिल्म्समध्ये ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्यावेळी 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेच्या माध्यमातून त्याला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर बालाजीच्याच 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा तो भाग झाला. या मालिकेत त्याने मानव देशमुखची भूमिका वठवली होती. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला.