Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं असून दिवाळीच्या फटाक्यानंतरच प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी 4 नोव्हेंबरर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने अंतिम लढती आता निश्चित झाल्या आहेत. असे असले तरी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) नेते आणि माजी आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी आज (5 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना शिंदे गटाची साथ  सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


विशेष म्हणजे गेल्या लोकसभेला राजू पारवे यांनी काँग्रेसची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू पारवे यांनी मोठा निर्णय घेत भाजपची वाट धरली आहे.  


ऐन विधानसभेला मुख्यमंत्र्यांची साथ सोडत भाजपात प्रवेश


शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजू पारवे यांनी आज शिवसेना (शिंदे गट) सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवे यांनी सुरुवातीला बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केल्यानंतर त्यांच्या शब्दावर कालच राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला उमरेड मतदारसंघात दिलासा दिला होता. त्यानंतर आज राजू पारवे यांनी थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.


राजू पारवे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघातून राजू पारवे शिवसेनेकडून इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात उमरेड मतदार संघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवे यांनी बंडखोरी केली होती. कालच देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर आणि आश्वासनानंतर राजू पारवे यांनी त्यांची बंडखोरी मागे घेत उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आज तेच राजू पारवे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी वेगळा निर्णय घेत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.  


हे ही वाचा