Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमानला धमकीचा कॉल आला आहे. आता त्याला धमकी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. दबंग खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सलमान खानला धमकी देणारा अल्पवयीन मुलगा 16 वर्षांचा आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला धमकी देणारा मुलगा मुळचा राजस्थानचा असून त्याला शहापूर येथे त्याला त्याच्या भावासोबत पकडण्यात आलं आहे. या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याने सलमानला फोन का केला याचा पोलीस तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सलमान खान गेल्या काही दिवासांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता एका 16 वर्षीय मुलाने त्याला धमकीचा फोन केला आहे. त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 30 एप्रिलला तो सलमान खानला मारणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याने रॉकी भाई अशी स्वत:ची ओळख सांगितली असून तो मुळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री 9 वा. हा धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तसाप करत आहेत.
सलमान खानला याआधी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. स्वत:च्या संरक्षणासाठी त्याने परदेशातून बुलेटप्रुफ गाडीदेखील मागवली आहे. त्याला धमकीचा मेल आल्यानंतर त्याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी गॅंगस्टार गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सलमान खान धमक्यांना घाबरणारा नाही
लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांबद्दल सलमान खान म्हणाला होता,"धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल".
संबंधित बातम्या