Amit Shah Arunachala Visit: देशाचे गृहमंत्री अमित शहा सोमवारी (10 एप्रिल) सीमावर्ती राज्य अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा (Amit Shah)  म्हणाले की, सुईच्या टोकाएवढंही भारत (India) अतिक्रमण स्वीकारणार नाही. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काल (सोमवारी) अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यासंदर्भात वृत्त समोर येताच चीननं (China) माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुणाचल चीनचा भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. अशातच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी चीनला चागलंच खडसावलं आहे. तसेच, कुणीही भारताच्या सीमेकडे डोळे वर करून पाहू शकणार नाही. भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ गेला, असं म्हणत चीनला प्रत्युत्तरही दिलं आहे. 


गृहमंत्री अमित शाह यांचा अरुणाचल प्रदेशचा दौरा आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं वक्तव्य चीनच्या मंत्र्याकडून करण्यात आलं होतं. तसेच, अमित शहांचा दौरा दोन्ही देशांतील शांततेसाठी धोका ठरु शकतो आणि दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती बिघडू शकते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


अरुणाचलमध्ये गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?


चीननं गृहमंत्री अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात अमित शहांनी चीनला चांगलंच फटकारलं आहे. काल (सोमवारी) अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असताना अमित शहा म्हणाले की, 


आमचं लष्कर आणि आयटीबीपी जवानांच्या शौर्यामुळे आमच्या देशाच्या सीमेवर आम्हाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. तो काळ गेला जेव्हा कोणीही आमची जमीन काबीज करू शकत होता, पण आता सुईच्या टोकाएवढीही जमीन काबीज करता येणार नाही, असं अमित शाह म्हणाले. तसेच, आमचं धोरण स्पष्ट असल्याचंही ते म्हणाले. आम्हाला सर्वांसोबत शांततेत राहायचं आहे, पण आमच्या जमिनीवर एक इंचही अतिक्रमण आम्ही होऊ देणार नाही, असं म्हणत अमित शहांनी चीनला चांगलंच खडसावलं आहे. 


चीन काय म्हणाला होता? 


गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आक्षेप घेत बिजिंगमध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा केला. त्यामुळे त्या भागात भारताचा कोणताही अधिकारी किंवा नेत्याचा दौरा हा त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचंही चीनच्या प्रवक्त्यानं म्हटलं होतं. त्यांचा (गृहमंत्री अमित शहा) दौरा सीमाभागातील शांततेसाठी अनुकूल नाही. आमचा याला कडाडून विरोध आहे, असंही चिनी प्रवक्त्यानं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. 


भारत-चीन वाद नेमका काय? 


भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाच्या केंद्रस्थानी अरुणाचल प्रदेश आहे. आपल्या विस्तारवादी धोरणाचा एक भाग म्हणून चीन भारताच्या उत्तर-पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशावर दावा करत आहे. इतकंच नाही तर अक्साई चिन भागातही चीन भारतासोबत सीमावादावर आहे आणि ते आपलं संरक्षित राज्य भूतानचा भाग आपल्या देशाचा भाग असल्याचंही सांगत आहे.


चीन केवळ भारतासोबतच्या सीमावादावरच नाही, तर तो आपल्या भौगोलिक सीमेखाली येणाऱ्या जवळपास प्रत्येक शेजारी देशाच्या जमिनी आणि सीमांना आपला वाटा म्हणून सांगत आला आहे, तैवान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.