Saif Ali Khan Injured: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरात रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी केली. त्यानंतर सैफिनाच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यानंतर सैफ अली खान आणि घरात घुसलेली व्यक्ती आमने-सामने आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजताच्या सुमारास एका हल्लेखोरानं अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूनं हल्ला केला, त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर सैफ अली खानला लवकर बरं वाटावं, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
सैफ अली खानच्या टीमकडून एक अधिकृत निवेदन समोर आलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, सैफ अली खानच्या घरी रात्रीच्या सुमारास चोर घुसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. या घटनेचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात चोर शिरल्याचं सर्वात आधी त्याच्या घरातील एका महिला कर्मचाऱ्यानं पाहिलं. त्याला पाहून महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केला. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनं तिच्या हातावर चाकूनं वार केले. महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान धावत बाहेर आला आणि तिच्या मदतीसाठी धावला. सैफ अली खाननं अज्ञात व्यक्ती आणि सैफमध्ये झटापट झाली. त्यावेळी आरोपीनं हातातील चाकूनं सैफवर सहा वार करत पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सैफच्या घरात चोर घुसलाच कसा?
सैफच्या घरात घुसून त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, त्या तिन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर, ज्या महिला कर्मचाऱ्यावर पोलिसांनी वार केले होते. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी व्यक्ती घरात घुसली तिचा कुणाशी संपर्क झालेला का? किंवा सैफच्या घरातलं कुणी आधीपासूनच त्या व्यक्तीच्या संपर्कात होतं का? अशा पद्धतीची माहिती पोलीस घेत आहेत. तीन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वांद्रे परिसरात सैफ अली खानचं घर आहे. वांद्रे परिसर म्हणजे, हायप्रोफाईल एरिया. इमारतीत प्रवेश करणं तसं फारसं सोपं नाही. कारण इमारतीभोवती सुरक्षा रक्षकांचं जाळ कायम असतं. इमारतीला दोन गेट आहेत. एक मोठा गेट, चारचाकी गाडी जाण्यासाठी आणि दुसरा एक लहान गेट व्यक्तींना ये-जा करण्यासाठी. जर कुणालाही इमारतीत प्रवेश करायचा असेल, तर सुरक्षा रक्षकांना सामोरं जाऊन त्यानंतरच इमारतीत प्रवेश मिळतो. त्यानंतर इमारतीच्या आवारात आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्हीचं जाळं आहे. त्यामुळे कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर कुणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यामुळे इमारतीत प्रवेश करणं तितकसं सोपं नाही.
सैफ अली खान वांद्रे परिसरात असलेल्या एका इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतो. बाराव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून चोर घरात शिरल्याची माहिती मिळत आहे, जे जवळपास अशक्य असल्याचं वाटतंय. त्यामुळे चोर नक्की बाहेरुन इमरातीत आला की, तो इमारतीमधलाच कुणी होता? अशा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. आता नेमकी ती अज्ञात व्यक्ती सैफच्या बाराव्या मजल्यावरच्या घरात घुसलीच कशी? हे पोलीस तपासात समोर येईल.
तब्बल अडीच तास चाललं सैफवर ऑपरेशन
सैफ अली खानची शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास चाललं. सध्या सैफला ओटीच्या रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर धारदार शस्त्रानं सहा वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
महत्त्वाच्या इतर बातम्या :