बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाने बुधवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मकोका लागल्यापासून परळी, केज परिसरातील वातावरण तापले आहे. वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून आक्रमकपणे निदर्शने केली जात आहेत. यादरम्यान टॉवरवर चढणे, ठिय्या आंदोलन करणे, आत्मदहनाचा प्रयत्न आणि रस्त्यांवर टायर्सची जाळपोळ असे प्रकार घडत आहेत.
वाल्मिक कराड याला बुधवारी केज न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला केजऐवजी बीड न्यायालयात सादर करण्यास परवानगी मिळावी, यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला होता. ही विनंती न्यायालयाने मान्य केली होती. मात्र, वाल्मिक कराड याला केजवरुन बीडकडे आणत असताना घडलेल्या एका प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. केज ते बीड हे अंतर साधारण 60 किलोमीटर असून त्यासाठी तासाभराचा अवधी लागतो.
पोलिसांचा ताफा वाल्मिक कराड याला घेऊन बीडला जात असताना अचानक त्यांच्या ताफ्यात चार अनोळखी वाहने घुसली. आजुबाजूला पोलिसांच्या इतक्या गाड्या असतानाही चार अनोळखी वाहने ताफ्यात घुसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. एरवी पोलिसांच्या गाड्या दिसल्या की सामान्य लोक शक्यतो चार हात लांब राहणेच पसंत करतात. तरीदेखील या चार गाड्या पोलिसांच्या ताफ्यात कशा शिरल्या, याबद्दल सवाल निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे या चार गाड्या पोलिसांच्या ताफ्यात घुसल्या तशाच सहीसलामत बाहेरही पडल्या. आता पोलिसांकडून या वाहनांचा शोध सुरु असल्याचे वृत्त दैनिक 'लोकमत'ने दिले आहे.
दरम्यान, वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर बीडच्या काही भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत बुधवारी पांगरी गावात आक्रमक निदर्शने झाली. तर परळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही दहशतीमुळे दुकाने उघडली नव्हती. तर धर्मापुरी आणि शिरसाळा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेले जात असताना बीड सत्र न्यायालयाबाहेर राडा झाला. न्यायालयाबाहेर वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधी असे दोन गट जमले होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाल्मिक कराडच्या हाताचे ठसे घेतले
वाल्मिक कराड याला बुधवारी दुपारी साधारण 12 वाजता केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर त्याच्या हाताचे ठसे घेऊन अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अर्धा तास सीआयडी, एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याची चौकशी केली.
आणखी वाचा