Ranbir Kapoor cameo Controversy: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (Bads Of Bollywood)या सीरिजला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच प्रयत्नात आर्यनने कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सगळ्यांमधून स्वतःची छाप उमटवली आहे. मोठ्या दिग्गज कलाकारांना कॅमिओसाठी घेण्याचं धाडसही त्याने दाखवलं आहे. शाहरुख, सलमान, आमिर, राजामौली, करण जोहर, अर्शद वारसी, इम्रान हाश्मी आणि रणबीर कपूर यांचा यात विशेष सहभाग दिसतो. मात्र, या सीरिजमधील रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) एका मिनिटाचा सीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


रणबीर कपूरचा 'तो' सीन का आहे वादात?


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसीरिजमध्ये शेवटच्या भागात रणबीर कपूरचा छोटासा कॅमिओ आहे. त्यात रणबीर ई-सिगारेट ओढताना दिसल्यामुळे तो वादात अडकला आहे.  या दृश्यादरम्यान कुठेही धूम्रपानाविरोधी चेतावणी दाखवली गेलेली नाही. त्यामुळे आता हा मुद्दा गंभीर बनला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या दृश्याविरोधात आक्षेप घेतला असून यामुळे तरुणाई चुकीच्या दिशेने जाऊ शकते, असा इशारा दिला आहे. 


लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आयोगाने तात्काळ पावलं उचलली आहेत. एनएचआरसीने मुंबई पोलिसांना सीरिजचे निर्माते आणि कलाकाराविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना या प्रकारावर कारवाई करण्यास सांगितलं आहे.आर्यन खानच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रोजेक्टला जिथे प्रेक्षकांची दाद मिळत आहे, तिथेच या वादामुळे नवे संकट उभं राहिलं आहे. रणबीर कपूरचा फक्त एका मिनिटाचा कॅमिओ संपूर्ण टीमसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आता यापुढे काय पावलं उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


प्रत्यक्षात त्या सीनमध्ये घडतं तरी काय?


धर्मा प्रॉडक्शनच्या झगमगत्या ऑफिसमध्ये वातावरण तंग आहे. करण जोहर आपल्या खास अंदाजात सान्याला (आसमानची मॅनेजर) समजावत असतो – “तो आता वादात अडकला आहे, सोडून दे, तुला मोठ्या संधी मिळतील!” सान्या मात्र ठाम असते.आणि त्याच क्षणी एंट्री होते रणबीर कपूरची! नेहमीसारखा कूल मूड, स्मितहास्य आणि डॅशिंग स्टाईल. करण आणि रणबीरमध्ये मजेशीर संवाद होतो. रणबीरला पाहून सान्या थोडी बुजते. ती लगेच सांगते, “मी तुमची खूप मोठी फॅन आहे!” रणबीर हात पुढे करतो. सान्या समजते की हस्तांदोलन करायचंय, पण.. रणबीर म्हणतो, “हाय… द वेप!”


सान्या त्याला ई-सिगारेट देते. रणबीर कॅज्युअली झुरका घेतो, खुर्चीवर टेकतो आणि जणू काही काहीच झालं नाही अशा अंदाजात ऑफर टाकतो  “माझी मॅनेजर होशील का?” सान्या हसत नकार देते. करण जोहर लगेच म्हणतो, पहिल्यांदा एखाद्या मुलीने तुला नकार दिलाय का?” रणबीर हात छातीवर ठेवून नाटकी प्रतिक्रिया देतो, “ओह… असं वाटतं म्हणजे!” सान्या ऑफिसबाहेर निघून जाते. हा सीन तिथेच संपतो.


 






केवळ एका मिनिटाचा, पण तो प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. कथेच्या दृष्टीने हा प्रसंग छोटा असला, तरी त्यातलं ‘लॉयल्टीचं मॅसेज’ महत्त्वाचं आहे. मात्र रणबीरचा तो व्हेपचा झुरका आता त्याला अडचणीत आणतोय. कारण कायद्याने ई-सिगारेट्सवर बंदी आहे.